पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७५३
मराठी ललित साहित्य
 

 भास्कर दामोदर पाळंदे, परशुराम बल्लाळ गोडबोले, पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी, शिवराम रामकृष्ण निजसुरे, राजा सर टी. माधवराव, कृष्णशास्त्री चिपळूणकर, विठ्ठल भगवंत लेंभे, मोरो गणेश लोंढे, गणेश जनार्दन आगाशे, गोविंद वासुदेव कानिटकर, गंगाधर रामचंद्र मोगरे, विद्याधर वामन भिडे, पांडुरंग व्यंकटेश चिंतामणी पेठकर, कान्होबा रणछोडदास कीर्तीकर हे या काळातले कवी होत.
 पाळंदे यांची 'रत्नमाला' हा ईश्वरभक्तिपर पद्यग्रंथ आहे. बालबोधामृत, नामार्थदीपिका, सीताविरह, सीतापरित्याग, या गोडबोले यांच्या कविता. गंगावर्णना, गणेशपुराण, भट्टवंशकाव्य ही बापूसाहेब कुरुंदवाडकर यांची कविता. पांडुरंगशास्त्री पारखी यांच्या काव्याची, षड्ऋतुवर्णन, कृष्णाकुमारी, बोधामृत ही नावे आहेत. विद्याधनप्रशंसा, शंकरकुबेरआख्यानकाव्य, ही निजसुरे यांची काव्ये. भक्तिसुधा, विलापलहरी, (कीर्तीकर) गंगवर्णना (पेठकर). बोधशतक, बोधामृत, बोधसुधा (लोंढे). सासरची पाठवणी, माहेरचे मूळ, मुलीचा संसार, मंगळसूत्र (आठल्ये). हेन्री फॉसेट, तुकोजीराव होळकर, कोल्हापूरचे शिवाजी महाराज, राणी व्हिक्टोरिया, रामचरित्र, सुंदोपसुंद, शिविसौहार्द- अशी ही या काळातल्या कवींची काव्ये आहेत. यांचे विवेचन करताना- यांची भाषा संस्कृतप्रचुर व दुर्बोध आहे, यांची भूमिका उपदेशकाची आहे, यांचे वळण सर्व संस्कृत पद्धतीचे आहे, ही काव्ये भावहीन, उत्कटताहीन आहेत. ही काव्ये बोजड असून अनुप्रास, यमक यांमुळे सौंदर्यशून्य झाली आहेत, यांत अर्वाचीन विचार मुळीच नाही, सृष्टिवर्णने प्रत्यक्ष अनुभूतीची नाहीत, वेदान्त, मोक्ष, पुनर्जन्म या विषयांवरच अनेकांचा भर आहे- अशी टीका टीकाकारांनी केली आहे. यांतील काही कवींनी- कानिटकर, कीर्तीकर यांनी- इंग्रजी काव्याची मराठी भाषांतरे केली आहेत, पण तरीही त्यांच्या इतर काव्यांत, पुढे केशवसुतांनी जे वळण आणले, ते नाही. मुख्य म्हणजे त्यात आत्माविष्कार किंवा आत्मलेखन नाही. भावगीत यातील एकानेही लिहिले नाही. पण ते नसते तरी फारसे बिघडत नव्हते. त्या काळी लोकहितवादी, जांभेकर, फुले, रानडे हे पंडित जे धर्म, समाज, विषयी विचार मांडीत होते ते जरी यांनी कोणी काव्यात मांडले असते, तशी कथानके निवडून त्यावर काव्य केले असते, तरी स्वकाळ त्यांनी जाणला, असे झाले असते. यांपैकी बहुतेक कवी इंग्रजी विद्या शिकलेले होते. भोवताली वरील प्रकारचे वाङ्मय लिहिले जात होते. वृत्तपत्रात हरघडी नवे विचार येत होते. तरी यांच्या काव्यात बव्हंशी त्यातले काही भेटत नाही, हे फारच खेदजनक वाटते.

केशवसुत आणि नवी कविता
 वरील सर्व कवी जुन्या पठडीतूनच लिहीत राहिल्यामुळे पाश्चात्य प्रेरणा घेऊन मराठी काव्याचे स्वरूप अंतर्बाह्य पालटून टाकणाऱ्या केशवसुतांना 'अर्वाचीन कविकुलगुरु' ही पदवी प्राप्त झाली. व्यक्तिवाद हे नव्या युगाचे लक्षण. ते आत्माविष्काराच्या रूपाने
 ४८