पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



४०.
मराठी ललित साहित्य
 



मिशनरी
 ब्रिटिश कालातील मराठी साहित्याचा विचार करताना पहिली गोष्ट ध्यानात येते ती ही की या साहित्याचा प्रारंभ ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेला आहे. त्यांना सर्व हिंदुस्थानात धर्मप्रसार करावयाचा होता. त्यासाठी बायबलचे सर्व भाषांत भाषांतर करणे अवश्य होते. त्यांतच त्यांनी बायबलचे मराठी भाषांतर केले. आणि या काळातल्या गद्य लेखनास प्रारंभ झाला. धर्मप्रसारासाठी त्यांना लोकांना शिक्षण द्यावयाचे होते. म्हणून त्यांनी शाळा काढल्या व त्या शाळांसाठी कमिक पुस्तके तयार केली. या पुस्तकांत अगदी प्राथमिक स्वरूपाची का होईना पण गणित, इतिहास, भूगोल ही भौतिक विद्याच होती. तेव्हा त्या शिक्षणाचा प्रारंभही या मिशनऱ्यांनीच केला. शिवाय भाषेच्या अध्ययनासाठी कोश व व्याकरण यांची आवश्यकता असते, हे जाणून तोही उद्योग त्यांनी केला. विल्यम केरी याने १८०५ साली मराठी व्याकरण व १८१० साली मराठी कोश तयार केला. तेथून पुढे लंडन मिशनरी सोसायटी, अमेरिकन मिशन, स्कॉटिश मिशन यांच्या न्यूवेल, ज्यूड्सन, यांनी असाच उद्योग केला. मोल्-स्वर्थ व कँडी यांनी मराठीचा कोश रचला तो तर प्रसिद्धच आहे रॉबर्ट निज्बिट, डॉ. जॉन विल्सन् स्टिव्हेन्सन हे १८३० च्या सुमारास हिंदुस्थानात आले व कोश, व्याकरण याबरोबरच ऋग्वेद, गीता यांची भाषांतरेही त्यांनी केली. ख्रिस्ती धर्मप्रसारार्थ