पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७१६
 

योग्यता ठरते, हे इंग्लिश जनतेनेच ठरविल्यामुळे हिंदी लोकांच्या मागण्यांना स्वाभाविकपणेच जोर आला. काँग्रेसच्या स्थापनेत दादाभाई नव्हते. पण ते तिचे अध्यक्ष झाले होते. या दरम्यान त्यांचे इंग्रज साम्राज्यशाहीच्या अभ्यासाचे व त्याअन्वये लोकजागृतीचे कार्य चालूच होते. १९०६ साली ते पुन्हा अध्यक्ष झाले, आणि स्वराज्यावाचून हिंदुस्थानचा रक्तशोष थांबविण्यास दुसरा उपाय नाही, असा संदेश त्यांनी दिला. मात्र तरीही इंग्रजांवरचा आपला विश्वास उडाला नाही, असे त्यांनी या भाषणात अवर्जून सांगितले.

न्या. मू. रानडे
 न्या. मू. रानडे हे १८७१ साली पुण्यास आले व त्यांनी राजकीय नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली आणि पुढील ८-१० वर्षात त्यांची भारतभर इतकी कीर्ती झाली की पुणे ही हिंदुस्थानची बौद्धिक राजधानी होय असे लोक म्हणू लागले. आधीच्या काळात १८५७ सालचे बंड होऊन गेले होते. त्या बंडाला जनतेचा पाठिंबा नव्हता. ते जुन्या संस्थानिकांचे व राजेरजवाड्यांचे बंड होते. 'स्वातंत्र्य युद्ध' म्हणून त्याचा गौरव करणाऱ्या सावरकरांनीसुद्धा शेवटी समारोपात हेच लिहिले आहे. जनतेने बंडाला का पाठिंबा दिला नाही याची मीमांसा करताना त्यांनी सांगितले की हे राजे- रजवाडे यशस्वी झाले तर पुन्हा तीच झोटिंगशाही सुरू होईल, तीच आपसातील युद्धे, तेच कलह पुन्हा होऊन देशाला पुन्हा अवकळा येईल, अशी जनतेला भीती वाटली. पुढे वासुदेव बळवंत यांचे बंड सुरू झाले. पण त्यालाही जनतेचा पाठिंबा मिळाला नाही.

लोकांचाही विश्वास
 यावरून एक गोष्ट स्पष्ट दिसते. इंग्रजांपूर्वीच्या राज्यकर्त्यावर लोकांचा विश्वास नव्हता. ते देशात चांगला राज्यकारभार करतील, शांतता प्रस्थापित करतील, असे त्यांना वाटत नव्हते. इंग्रजांना ते सामर्थ्य आहे व त्यांच्याच हातून हिंदुस्थानचे कल्याण होईल असा, केवळ पुढाऱ्यांचाच नव्हे, तर लोकांचाही विश्वास होता आणि भारतात जी चळवळ व्हावयाची ती सनदशीर राजकारणानेच झाली पाहिजे, असे त्यांना मनोमन वाटत होते. याच सनदशीर राजकारणाचा पाया न्यायमूर्ती रानडे यांनी घातला.

सनदशीर राजकारण
 ईश्वरी योजनेनेच इंग्रज हिंदुस्थानात आले आहेत, अशी रानडे यांची श्रद्धा होती. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हिंदी लोकांना समानतेने वागवावे आणि हिंदी लोकांनी ब्रिटिशांशी एकनिष्ठ राहावे, असा विचार ते सांगत. पाशवी बलाने २५ कोटी लोकांना दडपून टाकणे अशक्य आहे. तेव्हा लवकरच हिंदी जनता, ब्रिटिशांच्या शिक्षणाने व परमेश्वरी