पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


नेहरूंचा समाजवाद
 पण काँग्रेसला समाजवादी वळण देण्याचे कार्य समाजवादी नेत्यांना जमले नाही तरी, पं. जवाहरलाल नेहरू यांना त्या बाबतीत बरेचसे यश आले. १९२७ साली ते रशियाला गेले होते. त्या भेटीचा त्यांच्या मनावर फार खोलवर संस्कार झाला. केवळ राष्ट्रवाद हा अपुरा व संकुचित असून, समाजाचे व शासनयंत्राचे स्वरूप समाजवादानुसारी बनविल्यावाचून देशाचा उद्धार होणार नाही, असे आपले मत बनल्याचे, त्यांनीच आत्मचरित्रात लिहून ठेविले आहे. तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये व समाजात समाजवादी तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य मोठ्या हिरिरीने सुरू केले व ते वीस वर्षे मोठ्या निष्ठेने चालविले. विद्यार्थी परिषदा, प्रांतिक परिपदा यांचे ते वरचेवर अध्यक्ष होत. त्या पीठांवरून ते हे विचार सांगत व गांधीवादावर कडक टीका करीत. ती कशी असे त्यासंबंधीचा एक उतारा वर दिलाच आहे. १९२९ साली ते लाहोरच्या काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्या पदावरूनही, आपण समाजवादी असल्याचे सांगून, जमीनदार भांडवलदार हे विश्वस्त आहेत या महात्माजींच्या विचारावर त्यांनी प्रखर टीका केली. त्यांना विश्वस्त म्हणावयाचे, मग ब्रिटिशांनाच का म्हणू नये, असा मर्मभेदक प्रश्न त्यांनी विचारला आणि शेवटी, स्वातंत्र्य येऊनही, ब्रिटिशांच्या ऐवजी हिंदी सरकार येऊन, त्याने सध्याची मिरासदारी यथापूर्व चालू ठेविली तर त्या तसल्या स्वातंत्र्याला काडीइतकीही किंमत नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 पंडितजींची ही मते महात्माजींनाच नव्हे, तर इतर काँग्रेसनेत्यांनाही पसंत नव्हती. पण पंडितजींना त्यांनी काँग्रेसमधून काढून टाकले नाही आणि पंडितजीही काँग्रेसला सोडून समाजवादी पक्षाला मिळाले नाहीत. १९२९ साली काँग्रेस कार्यकारिणीने प्रथम गांधीजींनाच अध्यक्ष म्हणून निवडले होते. पण, पंडितजींची मते माहीत असूनही, गांधीजींनीच आग्रह धरून कार्यकारिणीकडून पंडितजींची निवड करविली. महात्माजींची थोरवी ती हीच. काही झाले तरी काँग्रेस अभंग राखिली पाहिजे, असा त्यांचा निश्चय होता.

वर्गविग्रह-निषेध
 काँग्रेसच्या नेत्यांची जमीनदारी, तालुकदारी यांच्या हक्कांना घटनेच्या मूलभूत तत्त्वांत समाविष्ट करण्यास संमती होती. १९३४ साली, कार्यकारिणीने वर्गविग्रहाचा पुरस्कार करणाऱ्यांचा निषेध केला आणि मालमत्तेची जप्ती करणे हे काँग्रेसच्या अहिंसा धर्माच्या विरुद्ध आहे, असा ठराव केला. यावर टीका करताना, 'मध्यवर्ती कायदेमंडळाच्या आगामी निवडणुकांच्या वेळी, धनिकांची मते मिळविण्याची इच्छा मनात बाळगणाऱ्या सनदशीर गटाच्या प्रेरणेनेच तो ठराव करण्यात आला हे उघड दिसते', असे पंडितजी म्हणाले. दिवसेंदिवस काँग्रेस नेत्यांचा व पंडितजींचा मतभेद तीव्र होऊ लागला, तरी त्यांनी एकमेकांना सोडले नाही. १९३६ साली पंडितजी पुन्हा