पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७०७
आर्थिक साम्राज्यशाही
 


दोनच वर्ग
 शहरातील गिरणी कारखान्यातील कामगार हे क्रान्तीचे खरे प्रणेते असून, देशात कामगार सत्ता प्रस्थापित झाली पाहिजे, असा त्यांचा सिद्धान्त होता. आतापर्यंत, कामगार व भांडवलदार यांचे हितसंबंध भिन्न आहेत, हे कोणी जाणलेच नव्हते, असे नाही. १९२० साली हिंदुस्थानात सुमारे २०० ट्रेड युनियन्स होत्या व लाला लजपतराय, सुभाषचंद्र यांसारख्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना पाठिंबाही दिला होता. पण कामगारांची स्थिती सुधारणे, त्यांचे कामाचे तास कमी करणे, वेतनवाढ करणे एवढीच या संघटनांच्या कार्याची व्याप्ती होती. वर्गविग्रह, भांडवलदारांशी लढा, कामगारांचे अधिराज्य, साम्राज्यशाहीशी लढा या विचारांशी त्यांची ओळखही नव्हती. पण कम्युनिस्ट पक्ष हे विचार घेऊनच उभा राहिला. आतापर्यंत भारतातील चळवळीची राष्ट्रवाद ही प्रमुख प्रेरणा होती. जमीनदार, शेतकरी, भांडवलदार, कामगार, हिंदू, मुस्लिम, स्पृश्य, अस्पृश्य यांचे हितसंबंध भिन्न असले तरी, ते सर्व भारतीय असून इंग्रज हा सर्वांचाचा शत्रु आहे, तेव्हा त्याच्याशी लढून आपल्या राष्ट्राला स्वतंत्र करणे, हे आपले पहिले उद्दिष्ट होय, अशीच शिकवण सर्वत्र दिली जात असे. कम्युनिस्टांना राष्ट्रवादच मान्य नव्हता. राष्ट्र, धर्म, वंश या सर्व भांडवलदारांनी कामगारांत फूट पाडण्यासाठी निर्मिलेल्या कल्पना असून, जगातले कामगार एकीकडे व भांडवलदार- जमीनदार एकीकडे, असे दोनच भेद आहेत, असे मार्क्सचे तत्त्व होते. तेव्हा कामगार- जागृती करून भांडवलदार वर्ग नष्ट करणे हे कम्युनिस्ट आपले प्रधान कार्य मानीत. ब्रिटिश भांडवलदार व हिंदी भांडवलदार असा भेद ते करीत नसत. सर्व जगातले भांडवलदार विरुद्ध सर्व जगातले कामगार असा त्यांचा लढा होता, आणि या विचारसरणीचा प्रसार करून हिंदी कम्युनिस्टांनी थोड्याच काळात भारतातील बहुतेक सर्व ट्रेड युनियन्सवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
 हे नवे तत्त्वज्ञान व त्याचे सामर्थ्य काय आहे याची ब्रिटिशांना बरोबर कल्पना असल्यामुळे ती चळवळ मुळातच नष्ट करावयाची असे त्यांनी ठरविले आणि प्रथमच १९२४ साली व नंतर १९२८ साली कम्युनिस्ट नेत्यांवर खटले भरून त्यांना अत्यंत कडक शिक्षा दिल्या. या वेळी त्या नेत्यांनी जे संघटनाचातुर्य, जे धाडस व जी प्रतिकारशक्ती दाखविली त्यामुळे हिंदुस्थानात त्यांचे सर्वत्र कौतुक झाले व त्यांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली.

रशिया राष्ट्रवादी
 पण हळूहळू जगात कम्युनिस्ट तत्त्वज्ञानातील मूळ आशय नष्ट होत चालला व फक्त फोलकटे शिल्लक राहिली. १९२६ साली स्टॅलिनने 'राष्ट्रमर्यादित समाजवाद' (सोशॅलिझम इन ए सिंगल कंट्री) ही घोषणा केली आणि मार्क्सने ज्या राष्ट्रवादाचा