पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४३
अस्मितेचा उदय
 

साम्राज्यात आल्यावर या देशाला 'महाराष्ट्र' असे नाव पडले. त्यातल्या त्यात संभवनीय उपपत्ती ही वाटते, इतकाच अर्थ.
 काळासंबंधी विचार करता थोडे जास्त निश्चित बोलता येणे शक्य आहे असे वाटते. कारण तेथे भाषेचा निकट संबंध आहे. महाराष्ट्री ही भाषा इ. पू. ३००/४०० च्या सुमारास उदय पावली. आणि भाषेला प्रदेशावरून नाव पडले असण्याची जास्त शक्यता असते; त्या अर्थी त्या काळच्या सुमारास किंवा आगेमागे महाराष्ट्र हे नाव रूढ झाले असावे असे अनुमान करणे शक्य आहे. शूरसेन प्रांतातली ती शौरसेनी, मगधातली ती मागधी अशी नावे त्या त्या प्रदेशावरून प्राकृत भाषांना मिळाली हे सर्वमान्य आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्राची ती महाराष्ट्री हे मत स्वीकार्य वाटते आणि यामुळेच महाराष्ट्र हे नाव याच स्वरूपात, किंवा महारठ्ठ, महरट्ट या स्वरूपात तरी निदान, इ. पू. ४००/५०० च्या सुमारास पडले असणे संभवनीय आहे.

प्रादेशिक अस्मिता
 इ. पू. ३०० पासून महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास या ग्रंथात सांगावयाचा आहे. त्यासाठी त्या काळापासून महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व होते, पृथगात्मता होती हे निश्चित करणे प्रथम अवश्य होते. महाराष्ट्री भाषा व महाराष्ट्र हे नामाभिधान यांचा इतिहास पाहून ते प्रथम आपण निश्चित केले. आता पृथगात्मतेचे याहीपेक्षा एक महत्त्वाचे लक्षण पाहून हा विषय पुरा करू.
 भाषा, भूप्रदेश व लोक यांना काही भिन्नता, पृथगात्मता प्राप्त झाली असली तरी राष्ट्राच्या पृथगात्मतेचे खरे लक्षण म्हटले म्हणजे या पृथगात्मतेची लोकांच्या मनात जागृत असलेली जाणीव हे होय. प्रादेशिक अस्मिता, अहंता याचा हाच अर्थ आहे. अहंता ही लोकांच्या मनातच असू शकते. आम्ही इतरांपासून निराळे आहोत, म्हणजे श्रेष्ठ आहोत ही भावना म्हणजेच अस्मिता. हीच मानवाच्या सर्व कर्तृत्वाची जननी आहे. तेव्हा इ. पू. ३०० पासून इ. स. १३०० या कालखंडात महाराष्ट्रातील लोकांना, महरठ्ठांना आपला देश, आपला समाज व आपली भाषा यांचा अभिमान कितपत होता याचा विचार आता केला पाहिजे. संस्कृतीला प्रारंभ होण्यापूर्वी प्रत्येक देशाच्या गिरिकंदरात रानटी जमाती राहातच असत. तशा महाराष्ट्रातही होत्या. कातवडी, ठाकर, कोळी, गाेंड, भिल्ल, वारली या येथल्या आदिवासी जमाती होत, असे अभ्यासक आज सांगत आहेत. या जमाती परस्परांपासून भिन्न होत्या. त्यांच्या भाषाही भिन्न असण्याचा संभव आहे. पण आम्ही इतरांहून श्रेष्ठ आहो, आमचे कर्तृत्व असामान्य आहे अशी प्रबळ अहंता, असा प्रखर अभिमान त्यांच्या ठायी निर्माण झालेला नव्हता. म्हणूनच त्यांची कसलीही प्रगती होऊ शकली नाही.
 ग्रीकांचा उदय झाला त्या काळी त्यांच्या शेजारच्या प्रदेशात बल्गर, रुमिनी, सर्ब इ. रानटी जमाती राहात होत्या. ग्रीकही प्रारंभी त्यांच्याप्रमाणे रानटी अवस्थेतच होते.