पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६५१
नव्या प्रेरणा
 

रूढ झाली व चतुर्वर्गचिंतामणी, निर्णयसिंधू, धर्मसिंधू असे ग्रंथ तयार होऊ लागले आणि मानवी बुद्धीला अत्यंत अवजड अशा बेड्या पडल्या, स्वतंत्र विचार करणे हे येथे संपुष्टात आले.

रूढिप्रामाण्य
 या शब्दप्रामाण्याच्या जोडीला रूढिप्रामाण्य आले. ब्राह्मण लोक संस्कृत ग्रंथ वाचीत. पण इतर जातींत श्रुतिस्मृतींकडे कोणी पाहात नसे. पण त्या प्रत्येक जातीच्या पंचायती असत. आणि ठरलेल्या रूढीबाहेर कोणी वागला तर त्या पंचायती त्याला व त्याच्या कुटुंबाला बहिष्कृत करीत. ही शिक्षा फाशीच्या शिक्षेपेक्षाही जास्त भयंकर होती, असे मागे सांगितलेच आहे. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिप्रामाण्य हे भारतातून अजिबात लुप्तच झाले. मागे अनेक शास्त्रांमध्ये आर्यभट्ट, नागार्जुन यांसारखे थोर पंडित येथे होऊन गेले. पण या पुढच्या काळात, काही अपवाद वजा जाता, तसे शास्त्रज्ञ झाले नाहीत, याचे हेच कारण होय.

शास्त्र म्हणजे काय ?
 बुद्धीवरची ही बंधने ब्रिटिश कालात नष्ट होऊ लागली. या बुद्धिस्वातंत्र्याचा पहिला मोठा पुरस्कर्ता म्हणजे लोकहितवादी हा होय. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की 'मनूचे वचन असो, याज्ञवल्क्याचे असो, कोणाचे का असेना, ब्रह्मदेवाचे का असेना, 'बुद्धिरेव बलीयसी' असे आहे. तुम्ही उघड जे पाहता त्याचा बंदोबस्त, शास्त्रात नाही, म्हणून करीत नाही, हे योग्य नाही. शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा, विचार करून पाहा', असा उपदेश त्यांनी पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना केला आहे. परदेशगमनाविषयी त्यांनी असाच विचार सांगितला आहे. 'दुसरे मुल- खात जाऊ नये असा शास्त्राचा अर्थ नसेल असे वाटते आणि जर कदाचित असला तर ती शास्त्राज्ञा मानण्याची जरूर नाही.' ते म्हणतात, 'शास्त्र म्हणजे लोकांस सुख होण्याकरिता रीती घातली आहे. त्यातून जर काही विपरीत असेल तर एकीकडे ठेवण्यास चिंता काय आहे ?' बुद्धीवरील बंधनांना त्यांनी बेड्या म्हटले आहे. अलीकडे सावरकरांनी 'सप्त शृंखला' असा शब्द वापरला आहे. तोच शब्द शंभर वर्षापूर्वी लोकहितवादींनी वापरून शब्दप्रामाण्यावर घाव घातले, हे त्यांस विशेष भूषणावह आहे.
 लोकहितवादींनी उपदेश केला. पण तो उपदेश प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने आचरणात आणल्यावाचून कोणत्याही सुधारकाला, ब्रिटिश कालातील नेत्याला एक पाऊलही पुढे टाकता आले नसते. वर बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख केला आहे. त्यांनी 'दर्पण' व 'दिग्दर्शन' ही नियतकालिके चालविली. त्यांतील कोणताही विचार त्यांना जुने शब्दप्रामाण्य मानून लिहिता आला नसता. त्यांना इतर भाषा शिकता आल्या नसत्या. स्त्रियांना शिक्षण द्यावे असे म्हणता आले नसते. शुद्धिकार्याचा पुरस्कार