पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६५०
 

आमच्या विद्यार्थ्यास शिकविण्यास ज्या दिवशी हरकत होईल त्या दिवशी हिंदुस्थानचा भाग्योदय सरला आहे असे मी म्हणेन.' यावरून हिंदुस्थानचा भाग्योदय या पाश्चात्य शास्त्रांवर अवलंबून आहे असे त्यांचे निश्चित मत होते, असे स्पष्ट दिसते. मोर्लेसाहेब म्हणत, 'हिंदुस्थानातील सुशिक्षित लोक हे आमचे शत्रू आहेत.' त्याला उत्तर देताना टिळक म्हणत की 'आम्ही त्यांचे शत्रू नसून आमचे ज्ञान हे त्यांचे शत्रू आहे.' शिक्षण या विषयावर बोलताना ते नेहमी म्हणत की 'इंग्लंड, अमेरिका यांसारख्या स्वतंत्र देशांत जे शिक्षण देतात ते शिक्षण आम्हांला पाहिजे. इंग्लंडने ज्या प्रकारच्या संस्था काढून आपली स्थिती सुधारली, तशा प्रकारच्या संस्था काढून आपण आपली स्थिती सुधारून घेतली पाहिजे.' टिळकांची ही विवेचने वाचताना एक गोष्ट स्पष्टपणे ध्यानात येते की समाजाला जिवंतपणा यावयास हवा असेल तर पाश्चात्यांप्रमाणे प्रत्यक्षनिष्ठ, प्रयोगक्षम, दृक्प्रत्ययशरण अशा शास्त्रांचा अनाग्रही बुद्धीने आपण अभ्यास केला पाहिजे, हा सिद्धांत त्यांच्या मनाशी निश्चित झाला होता.
 लो. टिळकांच्या नंतर पाश्चात्य विद्येला कधी कोणी फारसा विरोध केला नाही. महात्माजींचा वैज्ञानिक सुधारणांना विरोध होता. पण एकतर मोटार, आगगाडी या यंत्रशक्ती ते स्वतः वापरीत असत आणि त्यांच्या या मताला कोणी फारसे महत्त्व दिले नाही.
 तरी एक गोष्ट मनाला जाणवते की पाश्चात्य विद्या येथे आल्या. आता त्या बहुजनातही पसरत आहेत. पण त्यांच्यामुळे जी बुद्धिवादी, प्रयोगनिष्ठ, प्रत्यक्षनिष्ठ, कार्यकारणनिष्ठ अशी वृत्ती भारतीय समाजात निर्माण व्हावयास पाहिजे, ती अजून झालेली नाही आणि ती नाही तोपर्यंत जी खरी प्रगती व्हावयास हवी, ती येथे होणार नाही.

बुद्धिप्रामाण्य
 या पाश्चात्य विद्येमुळे भारताला फार मोठी देणगी मिळाली, ती म्हणजे बुद्धिप्रामाण्य ही होय. शेकडो वर्षे येथे ग्रंथप्रामाण्याचे किंवा शब्दप्रामाण्याचे युग होते. सूत्रग्रंथांच्या काळापासून म्हणजे इ. सनपूर्व सातव्या आठव्या शतकापासून येथे शब्दप्रामाण्याला प्रारंभ झाला. पण तरीही इ. सनाच्या दहाव्या शतकापर्यंत त्याचा अमंल इतका जारी नव्हता. स्मृती या प्रमाण मानल्या जात, पण स्मृतिकार पूर्वीच्या स्मृतींवर टीका करून, मला हे मत मान्य नाही, असे निर्भयपणे सांगत असत. पण आठव्या शतकापासून नव्या स्मृती होण्याचेच बंद झाले आणि स्मृतींमध्ये कितीही परस्परभिन्नता असली तरी त्यांतील सर्व वचनांचा एकच अर्थ आहे, असे टीकाकारांनी लिहिले पाहिजे, असा कुमारिल भट्टाने दण्डक घालून दिला. तेव्हापासून हिंदुस्थानच्या विनाशास प्रारंभ झाला. ती प्रथा दहाव्या अकराव्या शतकापासून पूर्ण