पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
६४६
 

चांगले ओळखले होते. त्यामुळे तेथील राजेरजवाड्यांना एका निशाणाखाली गोळा करून, आपल्या साम्राज्याचा कोणी पाडाव करील, अशी भीती त्या वेळी ब्रिटिश मुत्सद्दयांना मुळीच वाटत नव्हती. सर जॉन शोअर याने म्हटले आहे की 'आपल्या गावापलीकडे देशाचे प्रेम म्हणजे काय याचे ज्ञान हिंदी लोकांना नाही. एखाद्या अधिकाऱ्याविषयी किंवा स्वामीविषयी त्याला प्रेम किंवा निष्ठा वाटेल. पण एकंदर राज्यसंस्थेविषयी तो अगदी बेफिकीर असतो. जो पगार देईल त्याच्यासाठी तो लढेल आणि जर त्याला असे दिसून आले की आपण ज्या सरकारची नोकरी करीत अहोत त्याचा पाडाव होत आहे तर तो त्या सरकारची नोकरी सोडून देईल आणि चांगल्या पगाराच्या किंवा लुटीच्या आशेने तो शत्रुपक्षाला जाऊन मिळेल.'
 माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, सर जॉन मालकम यांसारख्या ब्रिटिश राज्यकर्त्यांना हे पक्के कळून चुकले होते, आणि आपल्या ग्रंथांत व खलित्यांत त्यांनी लिहिलेही होते की 'येथील सामान्य जनता राष्ट्रनिर्मितीच्या ज्ञानापासून अलिप्त आहे, येथील राज्यकर्ते व संस्थानिक परकियांविरुद्ध एकजुटीने लढून स्वातंत्र्य स्थापना करण्यास नालायक आहेत आणि येथील विद्वानांना, जगाचे, भौतिक शास्त्रांचे आणि सामाजिक विद्यांचे गाढ अज्ञान आहे.' तेव्हा यांच्यापासून साम्राज्याला धोका नाही अशी त्यांची निश्चिती होती.

उदार धोरण
 पण असे असतानाही पाश्चात्य विद्यांचे ज्ञान हिंदी जनांना द्यावे याविषयी मात्र सर्व ब्रिटिश राज्यकर्त्यांचे एकमत होते. ही विद्या हिंदुस्थानात पसरली तर पुढे मागे आपल्या साम्राज्यास धोका आहे, राष्ट्रीयत्व जागृत होऊन हिंदी लोक आपणांस येथून घालवून देणे शक्य आहे, हे ते जाणत होते. तरीही त्यांना अर्ध रानटी ठेवून त्यांच्यावर दीर्घ काल राज्य करण्यापेक्षा त्यांना सज्ञान करून त्यांच्यांतून एकराष्ट्र निर्माण करणे हे आपल्या राष्ट्राच्या व मानवतेच्या दृष्टीने जास्त योग्य आहे व भूषणावह आहे, असे त्यांचे मत होते. सर जॉन मेटकाफ याने तर त्याकाळी हिंदी जनांना मुद्रणस्वातंत्र्यही दिले. त्यापायी त्याची नोकरी गेली. पण तरीही वरील मताचा आपला आग्रह त्याने सोडला नाही. या लोकांना विद्या देऊन आपण येथून जाणे हेच जास्त कीर्तीकर आहे, इंग्लंडला हितावह आहे, असेच तो म्हणत होता.

इंग्रजांच्या अपेक्षा
 या संबंधात ब्रिटिशांना भीती एकच होती. त्यांनी येथे साम्राज्य स्थापिले होते ते सर्व हिंदी सैन्याच्या बळावर; आणि त्या सैन्यात प्रक्षोभ माजून तेच जर आपल्यावर उलटले तर मग मात्र आपली धडगत नाही, ही ती भीती होय. त्यांना आशा अशी होती की प्रथम पाश्चात्य विद्या व राष्ट्रीयत्व हे हिंदी जनतेत पसरेल, त्यांच्या अंगी