पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



३४.
नव्या प्रेरणा
 



 हिंदुपदपातशाही स्थापावी, सर्व हिंदुस्थानावर मराठ्यांचे साम्राज्य स्थापन करावे, अशी मराठ्यांची आकांक्षा होती. पण यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्रांती करणे अवश्य होते, याची त्यांना कल्पनाही नव्हती. रणांगणातील पराक्रम, बाहुबल एवढ्यावरच हे सर्व भागेल असा त्यांना भ्रम होता. या दृष्टीने पाहता ते अगदी अडाणी होते. त्यांचा सर्वात मोठा जो शत्रू म्हणजे इंग्रज, त्याला त्यांनी जाणले नव्हते. म्हणून त्यांना त्यांच्या कार्यात यश आले नाही. येणे शक्यच नव्हते.

इंग्रजांनी जाणले
 इंग्रजांनी मात्र मराठ्यांना आणि सर्व हिंदी जनांना चांगले जाणले होते. हिंदी राजे, संस्थानिक किंवा त्यांचे विद्वान- अविद्वान मुत्सद्दी हिंदुस्थानात राष्ट्रीयत्व निर्माण करू शकत नाहीत; कारण ते जगाच्या संस्कृतीत मागासलेले, अर्ध रानटी, आपसात भांडणारे, शिस्तीचे व कवायतीचे महत्त्व न ओळखणारे, परकीय प्रभुत्वाची चीड न बाळगणारे, धर्मवेडात गुरफटलेले, आधुनिक राष्ट्रनिर्मितीस पारखे, लोकसत्तेचे ज्ञान नसलेले, आणि जगातील घडामोडींविषयी पूर्ण अज्ञानी, असे आहेत, हे इंग्रजांनी