पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६१९
साहित्य आणि कला
 

शाहिरांत सर्व जातींचे शाहीर होते. तसे नव्हते फक्त पंडित कवींत. कारण ती रचना संस्कृतप्रचुर होती, वृत्तबद्ध होती आणि संस्कृत विदग्ध महाकाव्य हा तिचा आदर्श होता. असो. ] सवाई माधवराव आणि खर्ड्याची लढाई हे याचे दोन पोवाडे फार प्रसिद्ध आहेत. लावण्यांना याने रागदारीच्या चाली लावल्यामुळे याला मोठी कीर्ती मिळाली. 'शंकरपार्वतीसंवाद', 'श्रीकृष्णतुला', 'दमयंती विलाप', 'द्रौपदी- वस्त्रहरण' या व इतर त्याच्या कवनातून सवतीमत्सर, कारुण्य, वात्सल्य, वीररस इ. सर्व भाव प्रगट होतात. 'नूतन वय दोघांचे', 'पति प्रवासामध्ये' 'हार नव्हता साहत' या शृंगारिक लावण्या अजोड आहेत. महादजी शिंदे रंग खेळले, त्यावरही त्याने एक पोवाडा रचला आहे.

राम जोशी
 राम जोशी वाला शाहिरांचा तुरा म्हणतात. लहानपणीच तो लावण्या रचून तमासगिरांना देऊ लागला. पुढे बयाबाई व चिमाबाई यांच्यासह त्याने स्वतःचाच तमाशा काढला. त्यात त्याने अमाप पैसा मिळवला आणि विलासी राहण्यात खर्चही केला. पुढे तो कीर्तनकारही झाला. मोरोपंतांच्या आर्या यानेच प्रथम कीर्तनात आणल्या. 'ब्राह्मणी राज्य जोरावर' या पोवाड्यात याने पुण्याच्या वैभवाचे वर्णन केले आहे. दुष्काळ, लूटमार अशा प्रसंगांवरही त्याने पोवाडे रचले आहेत. पण राम जोश्याची प्रसिद्धी त्याच्या शृंगारी लावण्यासाठी आहे. 'सुंदरा मनामध्ये भरली', 'कोण्या ग सुभगाची मंजरी', 'तुम्ही सजणा' या लावण्यांची गोडी अजूनही अवीट आहे.
 शाहिरांचा वेदांत, अध्यात्म यांशी तसा काही संबंध नाही. त्यांची वृत्ती अगदी निराळी होती. पण त्यांतील अनेकांनी त्या विषयांवर लावण्या रचल्या आहेत. त्यांना भेदिक लावण्या असे म्हणतात. 'दो दिवसांची तनु ही साची', 'नरजन्मामधि नरा करुनि घे', या राम जोश्याच्या वेदांतपर लावण्या त्या काळी मान्यता पावल्या होत्या. आपल्या शेजारच्या एका ढोंगी बुबावर, 'हटातटाने पटा रंगवुनि' ही त्याने रचलेली लावणी तर सर्वांच्याच तोंडी झाली होती.

प्रभाकर
 प्रभाकराचे नाव राम जोश्याइतकेच, आणि काहींच्या मते, त्यापेक्षाही मोठे आहे. हा गंगुहैबतीच्या प्रसिद्ध फडात असे. 'सवाई माधवराव- रंग', 'खर्ड्याची लढाई', 'दुसरा बाजीराव' हे त्याचे पोवाडे आहेत. 'मोहिनी जशी सुरसभेमधी', 'डुलत डुलत चाले', 'कंठ तुझा मंजूळ', 'नका जाउ दूर देशी' या त्याच्या लावण्या फार लोकप्रिय होत्या, 'धन्य वंश एकेक पुरुष कल्पवृक्ष पिकले', 'अपार दिधलिस संपत्ति सुख भोगायाला', 'यशस्वी झाले श्रीमंत पहिले लढायाला' या पोवाड्यांनी प्रभाकराचे नाव मराठ्यांच्या कायम ध्यानात राहिले आहे.