पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५६८
 

बादशहा मराठ्यांच्या साह्याने २५ डिसेंबर १७७१ रोजी दिल्लीत आला व त्याने सिंहासनारोहण केले आणि मराठ्यांचा दोन वर्षीचा उद्योग फलद्रूप झाला. माधवरावाने या वेळी पत्र पाठवून यासाठी या सरदारांचा खूप गौरव केला.

पानपतचा सूड
 बादशहाला दिल्लीस पोचविल्यावर लगेच मराठे रोहिलखंडावर चालून गेले. रोहिल्यांचे परिपत्य करणे हे बादशाहालाही अवश्य होते. त्यामुळे स्वारीत तोही बरोबर होता. मध्यंतरी १७७० च्या ऑक्टोबरात नजीबखान मृत्यू पावला होता. आणि त्याचा मुलगा झबेताखान हाच आता त्याच्या जागी आला होता. रोहिल्यांचे पूर्ण निर्दाळण करून पानपतचा सूड उगवावयाचा असा महादजीचा निर्धार होता. आणि या स्वारीत त्याने तो पूर्ण केला. सर्व प्रांत उद्ध्वस्त करून जाळपोळ, लूट, कत्तल, संहार असा मराठ्यांनी तेथे कहर उडवून दिला. पानपतला लुटलेली अपार संपत्ती त्यांना तेथे सापडली. तेव्हापासून कैद करून ठेवलेल्या काही बायकाही सापडल्या. झबेताखान पळून गेला. पण त्याची बायका-मुले मराठ्यांच्या हाती सापडली. नजीबखानाची कबर पलीकडे होती, ती त्यांनी फोडून टाकली आणि पुरेपूर सूड उगवला. त्यांची रोहिल्यांना इतकी दहशत बसली की मराठा स्वार दुरून दिसला तरी ते पळून लपून बसत. अशा रीतीने सर्वत्र पूर्ववत अंमल बसवून मराठी फौजा १७७२ च्या जूनमध्ये छावणी- साठी दिल्लीला आल्या. पानिपतच्या कर्तव्याची पूर्तता झाली !

दुहीचे प्रायश्चित्त
 मराठ्यांचा पराक्रम यात उत्तम दिसून आला. पण याच वेळी मराठ्यांच्यात दुही माजू लागली. नजीबाला पाठीशी घातल्यामुळे होळकर व शिंदे यांचे वाकडे आलेच होते. आता त्याच्या जागी त्याचा मुलगा झावेताखान आला. त्यालाही होळकराने पाठीशी घातले. दिल्लीची मीरबक्षीगिरी झावेताखानाला हवी होती; पण महादजीने ती बादशहाकडून नारायणराव पेशव्याच्या नावे करून घेतली. यामुळे पुन्हा शिंदे व होळकर यांच्यात वाकडे आले. रामचंद्र गणेश कानडे व विसाजी कृष्ण बिनीवाले यांचे तर इतके वाकडे आले की माधवरावाला सांगून विसाजी कृष्णाने रामचंद्र गणेशला पुण्यात परत लावून दिले. झावेतखानाच्या बाबतीत विसाजी कृष्ण होळकराच्या बाजूचा होता. त्याने झावेताखानाला हाताशी धरले. याची महादजीला इतकी चीड आली की दिल्ली सोडून तो जयपुराकडे खंडण्या वसूल करण्यासाठी म्हणून निघून गेला. हे पाहून सुजा उद्दौला, हाफीज रहमत खान व खुद्द बादशहा यांनी उचल केली. बादशहाचा सरदार मिर्झा नजफ खान याने तर होळकर व बिनीवाले यांच्या छावणीवर हल्लाच केला. पण मराठ्यांनी त्याचा पराभव करून दिल्लीला वेढा घातला; तेव्हा घाबरून जाऊन बादशहा पुन्हा शरण आला. पण इतक्यात रोहिल्यांनी मराठ्यांची