पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५६७
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

 सुरजमल जाट व नजीबखान रोहिला यांचा दोघांचाही दिल्लीचा कबजा घेण्याचा प्रयत्न होता. पण १७६३ च्या डिसेंबरात सुरजमल्लावर अचानक हल्ला करून नजीबखानाने त्यास ठार मारिले. पण सुरजमल्लाच्या मुलांपैकी मोठा मुलगा जवाहीरसिंग मोठा पराक्रमी होता. त्याने नजीबखानावर स्वाऱ्या करून, अनेक लढायांत त्याचा धुव्वा उडविला आणि आपली सत्ता खूप वाढविली. नर्मदेपर्यंत राज्य करावे, अशी जाटांची महत्त्वाकांक्षा होती. मराठे १७६९ च्या अखेरीस जाटाच्या मुलखात शिरले. त्या वेळी जवाहीर मृत्यू पावला होता. आणि त्याचे भाऊ रणजितसिंग व नवलसिंग त्यांच्यात कलह चालू झाला होता. त्यांतील रणजितसिंगाने मराठ्यांची मदत मागितली. ती देऊन मराठ्यांनी नवलसिंगाचा मोड केला आणि त्या भागात आपली ठाणी वसविली.

मल्हाररावांचे व्रत !
 त्यानंतर रोहिल्यांचे पारिपत्य हे मराठ्यांचे दुसरे काम होते. तेही त्यांनी लगेच अंगावर घेतले असते. पण नजीबखान ! मराठ्यांनी हे नाव चांगले ध्यानात ठेवले पाहिजे. घरामध्ये राघोबा, तसाच शत्रुपक्षात नजीबखान होता. आणि त्याला जसे मराठे सरदार मिळत तसेच यालाही मिळत. जाटांचा पराभव झाल्यावर आता आपली धडगत नाही हे नजीबखानाने ओळखले आणि तुकोजी होळकराशी संधान बांधले; आणि बादशहाला दिल्लीस आणण्यास मी तुम्हांस मदत करतो, असे आश्वासन दिले. मल्हारराव होळकर १७६६ साली मृत्यू पावल्यावर तुकोजी हा होळकरांचा सेनापती झाला होता. त्याने मल्हाररावाचेच व्रत पुढे चालवून नजीबखानास पाठीशी घातले. महादजी शिंदे यास हे मुळीच रुचले नाही आणि मागल्या पिढीचे शिंदे होळकरांचे वैमनस्य पुढे चालू झाले. त्या वेळच्या एका पत्रात याविषयी लिहिलेले आढळते की 'अहंमदखान बंगष चाळीस हजार फौज घेऊन गंगे अलीकडे उतरला आहे. त्याचे व नजीबखानाचे सूत असून, रामचंद्र गणेश, शिंदे व होळकर त्याचे भरी पडले आहेत. नजीबखान महा खेळ्या आहे. या अहंमदखान बंगषाने मराठ्यांचे सोळा परगणे दडपले होते. तेव्हा त्याचा पाडाव करणे मराठ्यांना प्राप्तच होते. त्याच्यांशी झालेल्या लढाईच्या वेळी, दोन नद्यांमध्ये मराठे नजीबखानाच्या कारवाईनेच कोंडले गेले होते. पण तेवढ्यात यमुनेला उतार झाला, मराठे पलीकडे जाऊ शकले आणि बंगषाचा पराभव झाला आणि त्याने मराठ्यांचा सर्व प्रदेश परत दिला.

बादशहा
 यानंतर मराठे मुख्य उद्योगास लागले. बादशहाला परत दिल्लीला आणणे हा त्यांचा मुख्य कार्यक्रम होता. इंग्रज त्याला दिल्लीला पोचवीत नव्हते. पण मराठ्यांचा आश्रय तुम्ही करू नये, ते शेवटी तुमचे राज्य घेतील, अशा अर्थाची पत्रे मात्र ते बादशहाला पाठवीत होते. पण या भूलथपांना आता फसावयाचे नाही, असे ठरवून