पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३१
अस्मितेचा उदय
 

गुप्ताचा अलाहाबाद येथील चौथ्या शतकातील शिलालेख पाहता असे दिसते की पिष्टपूर (मद्रास इलाखा ), ऐरंडपल्ल ( तेलंगण ), कांची, वेंगी व देवराष्ट्र इ. भाग म्हणजे कन्याकुमारीपासून नर्मदेपर्यंतचा सर्व प्रदेश दक्षिणापथात मोडत होता.
 पण काही ठिकाणी कमी व्यापक अर्थानेही दक्षिणापथ हा शब्द वापरलेला आढळतो. पांड्यांना जिंकून नंतर सहदेव हा दक्षिणापथाला गेला, असे महाभारतात म्हटले आहे. त्यावरून पांड्यांचा देश दक्षिणापथात समाविष्ट होत नव्हता असे दिसते. पेरिप्लसचा (ग्रीक) कर्ता दक्षिणापथाचा उल्लेख दक्षिणावेडस असा करतो. आणि भडोच पासून दामिरिका ( द्रविड देश ) पर्यंतच त्याची व्याप्ती सांगतो. दक्षिणावेडस हा, डॉ. भांडारकरांच्या मते, दक्षिणापथ, दक्षिणावध, दक्षिणावध - याचा अपभ्रंश असणे शक्य आहे. अशा काही प्रमाणांवरून दक्षिणापथाचा एक अर्थ तरी 'महाराष्ट्र' असा आहे, असे डॉ. रा. गो. भांडारकर ( कलेक्टेड वर्क्स, व्हॉ. ३ रा, पृ. ६ ), म. म काणे ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र, पूर्वोक्त ) व डॉ. केतकर (प्राचीन महाराष्ट्र, पृ. २२) या थोर पंडितांनी आपले मत दिले आहे. पाकिस्तान झाल्यापासून हिंदुस्थान या संज्ञेचा अर्थ बदलला आहे. मराठेशाहीत केवळ उत्तर हिंदुस्थानालाच हिंदुस्थान म्हणत असत. पोलंड, रुमानिया यांच्या सीमा आपल्या डोळ्यांदेखतच दोन वेळा बदलल्या. हे ध्यानात घेता 'दक्षिणापथ' या संज्ञेची विवक्षा पुरातनकाळी बदलली असणे शक्य आहे असे मानण्यास प्रत्यवाय येणार नाही असे वाटते.

घटक प्रदेश
 आज जिला आपण महाराष्ट्र म्हणतो तेवढ्या व्यापक भूमीला मागल्या काळात एक असे प्रदेशवाचक अभिधान होते की नाही याचा येथवर आपण शोध घेतला. त्यावरून इ. सनाच्या चौथ्या शतकापर्यंत महाराष्ट्र हे नाव सापडते; त्याआधी ४ । ५ शतके इ. स. पूर्वी तिसऱ्या शतकापर्यंत महाराठ्ठ हे नाव आढळते आणि त्याच्यापूर्वी दक्षिणापथ हे नाव सापडते, असे दिसले. हा अखिल महाराष्ट्राच्या नावाविषयी विचार झाला. पण महाराष्ट्राचे जे विदर्भ, मराठवाडा, कोकण इ. विभाग आहेत त्यांचे स्वतंत्र उल्लेख याच्या पूर्वीच्या काळच्या ग्रंथांतही विपुल सापडतात. त्यावरून असे दिसते की या सर्व भूप्रदेशाला एक अभिधान प्राप्त होण्याच्या पूर्वीपासूनच त्याच्या भिन्न भिन्न घटक विभागांत महाराष्ट्र संस्कृतीची जोपासना होत होती. विदर्भ, अश्मक, कुंतल, अपरान्त ही या भूमीच्या विभागांची नावे प्राचीन संस्कृत वाङ्मयात वारंवार आढळतात. त्याचप्रमाणे पांडुराष्ट्र, गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र अशीही येथल्या भूविभागांची नावे असलेली दिसतात. या नावांनी त्या काळी कोणत्या खंडमंडळांचा निर्देश होत होता ते पाहिल्यावर यांचा महाराष्ट्र भूमीत कसा समावेश होत होता, ते ध्यानात येईल.