पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
३०
 

जोडलेली आहे. प्र. ३१४ पाहा ) बुद्धघोष हा इ. सनाच्या ५ व्या शतकात झाला असे एक मत आहे. हा ख्रिस्ती शकाच्या पूर्वार्धात होऊन गेला, हे अनेक पुराव्यांनिशी सिद्ध झाले आहे असे ज्ञानकोशकार म्हणतात. महावंशाच्या दीड वर्षाच्या आधीच्या 'दीपवंस' या ग्रंथात महावंशाप्रमाणेच महारठ्ठला धर्मोपदेशक पाठविल्याचा उल्लेख आहे. 'महाधम्मरख्खितथेरो महारठ्ठं पसादयि । '
 महारठ्ठाचे हे उल्लेख इ. सनाच्या चौथ्या, पाचव्या, सहाव्या शतकातले असले तरी मोगली पुत्ततिस्स याने येथे धर्मोपदेशक पाठविले ही घटना इ. पू. तिसऱ्या शतकातली आहे. यावरून या प्रदेशाला त्या काळापासून 'महारठ्ठ' हे नाव रूढ झाले होते, असे मिद्ध होते, असे डॉ. पां. वा. काणे म्हणतात ते सयुक्तिक वाटते. ( एन्शंट जॉग्रफी अँड सिव्हिलिझेशन ऑफ महाराष्ट्र जे. बी. बी. आर. ए. एस. व्हॉ. २४. इ. स. १९१४–१६, पृ. ६२२ ).
 'महारठ्ठ' हा देशवाचक शब्द असला तरी महारठ, महारठिनी हे शब्द तेथील स्त्रीपुरुषांचे वाचक होत हे उघड आहे. सातवाहनांच्या काळचे इ. पू. २०० पासून पुढचे नाणेघाट, भाजे, कारले, बेडसे, कान्हेरी येथले शिलालेख आता उपलब्ध झाले आहेत. त्यांत "वेदिसिरिस महारठिनो, महारठिस कोतकीपुतस विण्हुदतस, महाभोयबालिकाय महादेविय, महारठिनिय, महारठिस, गोतिपुत्रस, अग्निमिणकस, महाभोजिय बालिकाय महारठिणिय, " असे शब्द आले आहेत. हे सर्व महारठ शब्दाचे उपयोग महाराष्ट्राचे देश व लोक या नात्याने अस्तित्व निःसंशय सिद्ध करतात. ( डॉ. केतकर, प्राचीन महाराष्ट्र, पृ. २४ )

दक्षिणापथ
 आपल्या मायभूमीचे आजचे नाव ' महाराष्ट्र' असे आहे. त्याचा मागोवा घेताना ते इ.सनाच्या चौथ्या शतकापर्यंत रूढ असलेले आपल्याला आढळले. त्यापूर्वी या प्रदेशाचे नाव 'महारठ्ठ' असे होते. आणि महावंस, दीपवंश इ. ग्रंथांतील घटनांच्या आधारे पाहता ते इ. पू. तिसऱ्या शतकात सर्वविश्रुत होते असे दिसते. त्याच्या पूर्वीच्या काळात मात्र ही दोन्ही अभिधाने सापडत नाहीत. पण त्या पूर्वीच्या काळात 'महाराष्ट्र' भूमीला 'दक्षिणापथ ' असे नामाभिधान होते, असे काही विद्वानांचे मत आहे. त्याचा आता विचार करू. दक्षिणापथ हे नाव फार प्राचीन आहे. बौधायन- सूत्र, महाभारत, रामायण, पतंजलीचे महाभाष्य, इ. ग्रंथांत दक्षिणापथ हा शब्द अनेक वेळा आलेला आढळतो; पण अनेक ठिकाणच्या उल्लेखांवरून असे दिसते की 'दक्षिणापथा'त कोणत्या प्रदेशांचा समावेश होतो यासंबंधी भिन्न मते आहेत. नर्मदेपासून रामेश्वरापर्यंतच्या सर्व दक्षिण प्रदेशाला 'दक्षिणापथ ' म्हटलेले काही ठिकाणी आढळते. पूर्वचालुक्यांचा पहिला राजराज विष्णुवर्धन याने दिलेल्या दानात असे म्हटले आहे की विष्णुवर्धनाने सेतू व नर्मदा यांमधील सप्तलक्षांचा दक्षिणापथ जिंकला. समुद्र-