पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५४८
 

ताराबाईने दमाजी गायकवाडास चिथावून दिले, व त्याने पुण्यावर स्वारीच केली; पण त्यात त्याचा पराभव झाला आणि १७ लक्ष दंड भरून त्याने पेशव्याचा निम्मा हक्क मान्य केला. सुदैव एवढेच की पुढे त्याने गुजराथचा कारभार उत्तम सांभाळला. मराठ्यांनी चौथाई घेतली तरी सर्व राज्यकारभाराची जबाबदारी ते कधी घेत नसत. पण माळवा आणि गुजराथ येथे त्यांनी ती घेतली आणि त्यामुळे त्यांच्या सत्तेला सुखावह साम्राज्यसत्तेचे रूप आले.

रघूजी भोसले
 दमाजीप्रमाणेच रघूजी भोसले हा शूर व पराक्रमी होता. कर्नाटकात त्याने पराक्रम केल्यामुळे शाहू छत्रपतींची त्याच्यावर मर्जी होती. पण तोही पेशव्यांशी इतर सरदारांप्रमाणेच फटकून वागत असे. पेशवेपद नानासाहेबाला मिळू नये, बाबूजी नाइकास मिळावे, म्हणून त्याने खटपट केल्याचे वर सांगितलेच आहे. वास्तविक नानासाहेब नको होता, तर त्याने स्वतःसाठी पेशवाई मागावयाची होती. पण सर्व भारताच्या कारभाराला आटोप घालण्याची कर्तबगारी त्याच्या ठायी नव्हती. म्हणून पेशव्याच्या विरुद्ध मसलतीत सामील होणे हा मार्ग त्याने पत्करला.
 याच वेळी अलीवर्दीखान या सरदाराने बंगालच्या सुभेदारास मारून तो प्रांत बळकावला होता. बिहार व ओट्या हे प्रदेश त्या वेळी बंगालच्या सुभ्यातच येत. यातील ओट्यावर रघूजीने स्वारी केली. त्याचे पारिपत्य करण्यासाठी, बादशहाने, नानासाहेब त्या वेळी उत्तरेत होता, त्याची मदत मागितली. चौथाईच्या कराराप्रमाणे बादशाही प्रदेशाचे रक्षण करणे हे पेशव्याचे कामच होते. तेव्हा त्याला रघूजीला विरोध करावा लागला. भडाले मुक्कामी लढाई होऊन रघुजीचा पराभव झाला. पुन्हा नानासाहेब बंगालमध्ये शिरल्यावर दोघांची अशीच लढाई झाली. तीतही रघूजीचा पराभव झाला. तेव्हा त्या दोघांना साताऱ्यास बोलावून छत्रपतींनी बंगाल, बिहार आणि वऱ्हाड ते कटक हा सर्व प्रांत रघूजीला तोडून दिला. तेव्हापासून रघूजीचे व पेशव्याचे पुन्हा भांडण झाले नाही. पण त्याला दिलेले प्रदेश समस्त मराठी राज्याचा एक भाग आहे, असे त्याने कधी मानले नाही. शाहू छत्रपतींच्याकडे तो मुलखाचा ऐवज कधी पाठवीत नसे आणि त्यांच्या आज्ञाही पाळीत नसे. शिवाय शाहूची धाकटी राणी व रघूजीची बायको या चुलत बहिणी असून रघुजीचा मुलगा मुधोजी याला शाहू महाराजांनी दत्तक घ्यावे अशी तिची खटपट होती. त्यामुळे हे प्रकरण डोईजड झाले. रघूजीने बंगालमध्ये मोठा पराक्रम केला हे खरे ! पण तेथे राज्य स्थापन केले नाही. त्यामुळे मराठे लुटीपुरते येतात असेच सर्वत्र ठरले आणि हे लुटारू आहेत असाच भाव बंगाली लोकांच्या मनात रूढ झाला. एका हुकमतीत मराठे सरदार कधीच वागले नाहीत. शाहू छत्रपतींच्या हुकमतीतही ते राहिले नाहीत. त्यामुळे मराठी साम्राज्याला व्यवस्थित प्रस्थापित सत्तेचे रूप कधीच आले नाही. आणि एकाच मराठा छत्रपतीचे दोन