पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५४७
साम्राज्याचा विस्तार
 

प्राणपणाने लढत होते. मराठ्यांतील एखाद्या कर्तबगार पुरुषाने पंजाबात राहून त्यांची संघटना केली असती तर पंजाबात पाऊल टाकण्याचे धैर्य अबदालीस झाले नसते. पण मराठ्यांना स्वतःचीच संघटना दृढ टिकविता येत नव्हती. तसा कर्तबगार पुरुष त्यांना स्वतःसाठीच लाभला नाही, ते जाट, शीख, रजपूत यांच्यांत कशी संघटित शक्ती निर्माण करणार ? शिवसमर्थांच्या नंतर सर्वांगीण कर्तबगारी निर्माण करण्याची विद्याच येथून लोपली. रणांगणातील शौर्यधैर्य, एवढी परंपरा तरी मराठ्यांत टिकून राहिली हेच नशीब. तेवढ्यावर सर्व भारतातच काय, पण लहानशा महाराष्ट्राचासुद्धा कारभार यशस्वी करणे अशक्य आहे !

मराठा सरदार
 निजाम, कर्नाटकाचे नवाब, जाट, रजपूत हे बाहेरचे लोक झाले. पण, पूर्वी अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे, मराठा सरदारांची हीच स्थिती होती. त्यांतील दमाजी गायकवाड, रघूजी भोसले आणि तुळाजी आंग्रे यांचा या दृष्टीने विचार करू. मराठा साम्राज्याचे स्वरूप त्यावरून जास्त यथार्थपणे स्पष्ट होईल.

दमाजी गायकवाड
 गायकवाड हे सेनापती दाभाडे यांचे हस्तक. शाहू महाराजांनी गुजराथचा मोकासा पेशवा व दाभाडे यांस वाटून दिला. त्याबद्दल दाभाड्याची नेहमीच तक्रार चालत असे. वास्तविक सेनापती हा सर्व राज्याचा सेनापती, प्रतिनिधी हा सर्व मराठी राज्याचा प्रतिनिधी, असे असावयास हवे होते. पण छत्रपतींनी या अष्टप्रधानांना प्रदेश वाटून दिल्यामुळे एकराज्याची ही व्यवस्थाच राहिली नाही. एक फक्त पेशवाच काय तो सर्व राज्यकारभाराला जबाबदार, अशी स्थिती झाली. त्यामुळे प्रत्येकाच्या मोकाशात आपल्याला हक्क असला पाहिजे अशी पेशव्याची अट होती. पण मुळातच, आपण खानदानी सरदार आणि पेशवा हा कालचा पोर, अशी सर्व प्रधानांची घमेंड असल्यामुळे, यातून नित्य तक्रारी उदभवू लागल्या. त्यात मराठी राज्यातील आणखी एका अव्यवस्थेची भर पडली. मोकासे, वतने ही राज्याची सेवा करण्यासाठी दिलेली असतात. पण ती छत्रपतींनी वंशपरंपरा दिल्यामुळे मराठी राज्याचे फार मोठे नुकसान झाले. बापासारखा मुलगा पराक्रमी निघतोच असे नाही. तरी त्याचा सरंजाम मात्र कायम ! ही व्यवस्था नव्हे. ही मूर्तिमंत अव्यवस्था होय. त्रिंबकराव दाभाड्याचा मुलगा यशवंतराव हा अत्यंत व्यसनी व कर्तृत्वशून्य होता. तरी गुजराथचा सरंजाम शाहू महाराजांनी त्याच्याकडेच ठेवला. त्याने गायकवाडास हस्तक नेमून कारभार चालविला. पण गायकवाडास पैसा पुरविणे त्याला अशक्य होऊ लागले. शाहू छत्रपतींच्या मरणानंतर नानासाहेब पेशवे यांनी निम्म्या गुजराथवरचा आपला हक्क पुन्हा सांगितला व वसुलीसाठी आपले कमाविसदार तिकडे पाठविले. तेव्हा तर युद्धाचाच प्रसंग आला.