पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२७.
स्वराज्याचे साम्राज्य
 



 पेशवा बाळाजी विश्वनाथ याने मराठा शक्ती काही प्रमाणात संघटित करून स्वराज्याचे रक्षण केले आणि दिल्लीहून सनदा आणून त्याला बादशाही मान्यता मिळविली; तर त्याचा मुलगा बाजीराव याने या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करून मराठ्यांना हिंदुस्थानच्या इतिहासात वैभवाचे स्थान मिळवून दिले. ते साम्राज्य कसे झाले, त्याच्या मागे प्रेरणा कोणत्या होत्या, त्यातील मराठी सत्ता कशी होती आणि एकंदर त्या साम्राज्याचे स्वरूप काय होते ते संस्कृतीच्या दृष्टीने आता पहावयाचे आहे.

चौथाई पद्धती
 स्वराज्याचा विस्तार झाला तो चौथाईच्या पद्धतीने झाला. चौथाईची पद्धत प्रथम शिवछत्रपतींनी सुरू केली. काही प्रदेशावर त्यांनी आपली सत्ता पूर्णपणे बसविली होती. ते त्यांचे स्वराज्य. त्यानंतर ते वारंवार मोगलांच्या ताब्यातील मुलखावर स्वाऱ्या करीत. त्यामुळे तेथील प्रजाजनांना त्रास होई. तेव्हा त्यांनी तेथील अधिकाऱ्यांना व व्यापारी, सावकार इ. प्रमुख नागरिकांना सांगितले की 'या मुलखाच्या उत्पन्नाचा चौथा भाग म्हणजे चौथाई जर तुम्ही आम्हांला दिली तर आम्ही तुम्हांला कसलाही