पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५१६
 

रचले, तेव्हा नाइलाजाने त्याला मराठ्यांशी दोस्ती करावी लागली. आणि या संधीचा फायदा बाळाजीने घेतला. वर मराठ्यांना हा ग्रहयोग अनुकूल झाला असे म्हटले आहे. पण बाळाजीने अत्यंत मुत्सद्देगिरी लढवून आणि धाडशी डाव टाकून त्यांचा उपयोग करून घेतल्यामुळेच मराठ्यांचा लाभ झाला. नाहीतर अनुकूल योग येऊनही उपयोग होतोच असे नाही.

बादशहाला शह
 हुसेन सय्यद दक्षिणेकडे निघाला तेव्हा, गुजराथेत असलेल्या दाऊदखानास बादशहाने गुप्तपणे हुकूम पाठविला होता की त्यास कारभार न देता मारून टाकावे. त्याप्रमाणे दाऊदखान चालून आलाही; पण लढाईत दाऊदखानच मारला गेला (ऑगस्ट १७१५). हुसेन अलीविरुद्ध बादशहाने मराठ्यांनाही चेतविले होते; त्यामुळे त्यांनी मोगली मुलखावर हल्ले करण्यास प्रारंभ केला होता. हुसेन अलीने त्याशी मुकाबला करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खंडेराव दाभाडे आणि सुलतानजी निंबाळकर यांनी त्याच्या फौजांचा पूर्ण मोड केला. तेव्हा हुसेन अलीने मराठ्यांशी गोडी करून बादशहालाच शह देण्याचा डाव टाकला आणि मराठ्यांना ती सुवर्णसंधी मिळाली.

तह
 हुसेन अलीने शंकराजी मल्हार याच्या मार्फत शाहूछत्रपतींशी बोलणी सुरू केली. शंकराजी मल्हार पूर्वी राजारामांचा सचिव होता. पण ते पद सोडून तो जिंजीहून काशीस गेला व तेथून दिल्लीला जाऊन तेथे त्याने आपला जम बसविला. तो हुसेन अलीचा कारभारी म्हणूनच दक्षिणेत आला होता. बाळाजी विश्वनाथ आणि चिमणाजी दामोदर यांच्या मध्यस्थीने त्याने शाहूछत्रपतींशी वाटाघाटी चालविल्या आणि त्यांतूनच हुसेन अलीच्या मार्फत छत्रपती आणि बादशहा यांच्यांत तह ठरला. (१) शिवाजीच्या वेळचा स्वराज्याचा मुलूख शाहूच्या हवाली करावा. (२) अलीकडे मराठ्यांनी खानदेश, वऱ्हाड, गोंडवन, हैदराबाद व कर्नाटक या प्रांतांतले काही विभाग जिंकले होते, ते बादशहाने त्यांच्या स्वराज्यात दाखल करून टाकावे. (३) दक्षिणेतील मोगलांच्या सहा सुभ्यांतून मराठ्यांनी चौथाईचे व सरदेशमुखीचे हक्क वसूल करावे आणि त्या बदल्यात त्या मुलखात बादशहाचे मदतीसाठी पंधरा हजार फौज ठेवावी. (४) मराठ्यांनी बादशाहाला दरसाल दहा लाख खंडणी द्यावी. आणि (५) शाहूराजांची माता येसूबाई, त्यांचा कुटुंबपरिवार, संभाजीचा दासीपुत्र मदनसिंग यांना मुक्त करून स्वदेशी पोचवावे. असा तहाचा मुख्य मतलब होता.