पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५११
पेशवाईचा उदय
 


धनाजीचा मुलगा
 चंद्रसेन जाधव हा सेनापती धनाजी जाधव याचा मुलगा. धनाजीच्या मृत्यूनंतर शाहूछत्रपतींनी त्याला सेनापती नेमले. पण धनाजी हा स्वराज्याचा सर्वांत मोठा हितकर्ता होता, तर चंद्रसेन स्वराज्याचा सर्वांत मोठा शत्रू झाला. आरंभी शहागड, फत्यावाद अशा काही लढाया त्याने शाहू छत्रपतींच्या साठी जिंकल्या. पण जाधव, निंबाळकर, थोरात इ. सरदारांना ताराबाई आणि मोगल सुभेदार दाऊदखान यांच्याकडून सारखी विलोभने येऊ लागली, जागिरी, वतने, मनसबी यांची आश्वासने येऊ लागली. त्यामुळे त्यांची मने डळमळली आणि या तिघांतील जो भारी ठरेल त्याला मिळावयाचे असा विचार त्यांनी केला. शाहू किंवा ताराबाई यांच्या मागे उभे राहून आपण स्वराज्य-पक्ष भारी करावयाचा आहे असा ध्येयवाद त्यांच्या मनात नव्हता. त्यामुळे मोगलांकडून आश्वासने येताच त्यांनी शाहूछत्रपतींशी कुरापती काढून भांडणे करण्यास प्रारंभ केला.
 सरदेसाई लिहितात, खानाशी बळकट संधान सिद्ध झाल्यावरच चंद्रसेनाने शाहूकडे दरडावणी चालू केली. आणि, ताराबाईंना एका पत्रात चंद्रसेनाने स्वतःच लिहिल्याप्रमाणे, दमाजी थोरात, शहाजी निंबाळकर, संताजी पांढरे, खंडेराव दाभाडे, परशुरामपंत प्रतिनिधी, मानसिंग मोरे, यांची मने शाहूविरुद्ध वळवून, सर्वांनी साताऱ्यावर चालून जाण्याचा कट केला. ही कारस्थाने चालू असतानाच बंडखोर सरदारांच्या बंदोबस्तासाठी शाहू छत्रपतींनी चंद्रसेन व बाळाजी यांना पाठविले होते. त्या वेळी एका क्षुल्लक कारणावरून त्याने बाळाजीला कैद करण्याचे ठरविले, तेव्हा बाळाजी आपले लष्कर घेऊन साताऱ्यास गेला. त्या वेळी चंद्रसेनाने शाहूछत्रपतींना धमकी दिली की स्वामींनी बाळाजीस आमच्या स्वाधीन करावे, नाही तर आम्हांस महाराजांचे पाय सुटतील. या उद्धटपणाचे प्रायश्चित्त देण्याचे ठरवून छत्रपतींनी हैबतराव निंबाळकर यास त्याच्यावर पाठविले. जेऊरच्या लढाईत हैबतरावाने त्याचा पुरा मोड केला (१७११). तेव्हा चंद्रसेन उघडपणे प्रथम ताराबाईस आणि दोनच महिन्यांनी (ऑगस्ट १७११) दाऊदखानास मिळाला.

खटावकर
 याच वेळी खटावकरांनी दंगा सुरू केला. हे घराणे पूर्वापार मोगलांचे मनसबदार होते. स्वराज्यस्थापनेनंतरही अनेक घराणी मोगलांनाच आपले धनी समजत असत. त्यांतलेच हे एक. शाहूछत्रपतींनी बाळाजीस कृष्णराव खटावकर यावर पाठविले. या वेळी परशुरामपंत साताऱ्यास कैदेत होता. शाहूछत्रपतींची मर्जी सुप्रसन्न करून घेण्यासाठी त्याने आपला मुलगा श्रीपतराव यास बाळाजीबरोबर दिले. लढाईत कृष्णराव मारला गेला. त्याच्या मुलांना क्षमा करून शाहूराजांनी त्यांच्याकडे वतन कायम ठेविले.