पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८१
स्वातंत्र्ययुद्ध
 

मिळविले. मावळ - सातारा, वाई या भागात जे शंकराजी नारायणाने केले तेच परशुराम त्रिंबक याने मिरज-रांगणा या प्रदेशात केले. त्याची मुख्य कर्तबगारी दिसून आली ती औरंगजेबाने जिंकलेला पन्हाळा किल्ला परत घेण्यात. दोन वर्षे त्यासाठी त्याला लढावे लागले. पण अखेर त्याने तो गड जिंकला आणि बादशहाने जंग जंग पछाडले तरी पाच वर्षांपर्यंत तो जाऊ दिला नाही.
 पण मोगलांना नामोहरम करण्याचे मोठे श्रेय कोणास द्यावयाचे तर ते संताजी व धनाजी यांना. आणि विशेषतः संताजी घोरपडे यांना. मोगलांचे सामर्थ्य पार खच्ची करून टाकण्याची महनीय कामगिरी त्यांनीच केली.

संताजी घोरपडे
 पहिल्या सलामीलाच संताजी घोरपडे यांनी बादशहाच्या डेऱ्याचे कळस कापून त्याचा मुखभंग केला हे वर सांगितलेच आहे. १६९० साली बादशहाने सर्जाखान यास सातारा किल्ला घेण्यास पाठविले. पण संताजी व धनाजी यांनी त्यास हत्तीवरून ओढून कैद केले आणि एक लाख दंड घेऊन मग सोडून दिले. यानंतर बादशहाने फिरून जंगास पाठविले व त्याच्या मदतीस अब्दुल कादीर यास दिले. पण रुपाजी भोसले याने कादीरचे सर्व लष्कर लुटून फस्त केले. त्या नंतर लुत्फुल्लाखान सातारा घेण्यासाठी आला. पण म्हसवडजवळ संताजी, धनाजी, डफळे, मोरे यांनी त्याचा पराभव करून त्यास हाकलून लावले. बादशहाने विजापूर प्रांत जिंकला होता. त्यावर वारंवार झडप घालून संताजी तो प्रांत लुटून फस्त करीत असे. १६९२ साली संताजी व धनाजी यांनी बेळगाव-धारवाडवर हल्ले चढविले. बादशहाचे तीन सरदार वेदरबखखान, लुत्फुल्लाखान आणि हमीदुद्दीनखान बचावासाठी धावून आले. कासीमखानही शिऱ्याहून त्यांच्या मदतीला आला. पण ती शहरे लुटून मराठे केव्हाच पसार झाले होते.

आग्या मोहोळ
 या मोठ्या लढायांच्या वार्ता झाल्या. पण मोठ्या मराठा सरदारांनी मोगलांचा ठायी ठायी असा नक्षा उतरवलेला पाहताच सर्वच शिपाईगड्यांना अंगात वारे संचारल्यासारखे झाले आणि आग्या मोहोळ उठावे तसा प्रकार झाला. गुजराथ, बागलाण, गोंडवन येथपासून कर्नाटक, जिंजीपर्यंत मराठी फौजा वाऱ्यासारख्या फिरू लागल्या. हे मराठे छापे घालीत, खंडण्या घेत, बादशहाची ठाणी उठवीत, सामान, सुमान, हत्ती घोडे, उंट लुटून घेत. अकस्मात यावे, बकाने मत्स्य उचलून न्यावा तसा घाला घालावा, खाण्यापिण्याची दरकार बाळगू नये, थंडी, वारा, ऊन, पाऊस काही पाहू नये, चटणी, भाकरी घोड्यावरच खावी आणि वाऱ्यासारखे नाहीसे व्हावे, असा त्यांचा खाक्या होता. हे मराठे किती आहेत, कोठून येतात, याचा मोंगलांना काही अदमासच लागेना. बादशहा अगदी रडकुंडीला आला. तो म्हणे, 'मराठे आदमी नव्हत, हा भूतखाना आहे.'

 ३१