पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४७७
स्वातंत्र्ययुद्ध
 

त्याने विजापूर गोवळकोंडा पडल्यावर वाडीकर खेम सावंताला लिहिले की बादशहा- इतका थोर कुणी नाही. विजापूर, गोवळकोंड्याप्रमाणेच संभाजीचीही गत होईल. त्याच्या आत तुम्ही बादशहाकडे यावे. शिवाजी महाराजांचा जावई अचलोजी याला १६८६ साली पंचहजारी देऊन मोगलांनी वळविले. याशिवाय निरनिराळ्या कागदपत्रांत आणखी लहानमोठ्या तीसचाळीस फितुरांची नावे सापडतात. ज्यांची नोंद नाही असे आणखी कित्येक असतील.

निष्ठा लोपली
 याचा अर्थ असा की शिवछत्रपतींनी जी राष्ट्रनिष्ठा मराठ्यांच्या ठायी रुजविली होती ती आता लोपत चालली होती. छत्रपतींच्या काळी तिने वरी मुळे धरली होती. पण कोणत्याही निष्ठेला अखंड जलसिंचन हवे असते. शिवछत्रपती, समर्थ रामदास यांसारखे महापुरुषच हे काम करू शकतात. त्या दोघांच्या निर्वाणानंतर महाराष्ट्रात तसा पुरुष, तसा नेता, तस तत्त्ववेत्ता, कोणी झाला नाही. संभाजी महाराज विलासमग्न होते, कलुषाच्या आहारी गेले होते, हे प्रवाद आता खोटे ठरले आहेत. पण लोकांच्या राष्ट्रनिष्ठेला जलसिंचन करण्याचे सामार्थ्य त्याच्या ठायी नव्हते, हे खरेच आहे. ते स्वतःच एकदा मोगलांना मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या वाणीला ती महाप्रेरणा देण्याची शक्ती असणे शक्यच नव्हते. त्यामुळेच ते नवकर्तबगार पिढी निर्माण करू शकले नाहीत. हंबीरराव, हरजी राजे असे काही जुने कर्तेपुरुष होते. त्यांच्या वरच गुजराण होत होती. तानाजी, प्रतापराव गुजर, मोरोपंत, अनाजी यांसारखे तीस चाळीस लोक शिवछत्रपतींच्या भोवती होते. तसा नामांकित एकही पुरुष संभाजी महाराजांना निर्माण करता आला नाही. आणि दुसरा कोणीही राष्ट्रधर्माचा प्रणेता या काळात निर्माण झाला नाही. हे देशाचे दुर्दैव होय.

आर्थिक दुर्दशा
 मराठ्यांची प्रतिकारशक्ती ढिली पडण्याचे दुसरे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आर्थिक धनाची टंचाई हे होय. १६८१ सालापासून सर्व महाराष्ट्रभर लष्कराचा धुमाकूळ चालू झाला. त्यामुळे शेती आणि व्यापार ही दोन्ही आर्थिक क्षेत्रे उद्ध्वस्त होऊन गेली. शेती करायला कोणाला उत्साहच राहिला नाही आणि त्यातून थोडी शेती पिकली तर मोंगल तिची अखंड लूट करीत असत. संभाजी महाराजांना सर्व आघाड्यांमिळून पंचवीस तीस हजार लष्कर ठेवावेच लागत होते. शिवाय आरमार, दारूगोळा यांचा खर्च होताच. एवढा खर्च हळूहळू भागेनासा झाला. त्यामुळे लष्कराचे पगार थकू लागले. मग ज्या त्या तुकडीने, टोळीने, पथकाने आपापले भागवावे असे झाले. त्यामुळे शिवछत्रपतींच्या वेळची शिस्त संपुष्टात आली. त्यांच्या वेळी लष्करी लुटीतला सुतळीचा तोडाही कोणाला गिळंकृत करता येत