पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४६६
 

प्रायश्चित्त होते. पण त्यापेक्षाही फार भयंकर असे जातिबहिष्काराचे प्रायश्रित्त होते. परदेशात मनुष्य इतर जातीबरोबर जेवणार, त्यांच्या हातचे खाणार, आणि त्यामुळे त्याची जात बाटणार, म्हणून जातिपंचायती त्या माणसावर बहिष्कार टाकीत. त्यामुळे परदेशात जाऊन राहणे, तेथे विद्या शिकणे, व्यापार करणे असले साहस करण्यास कोणी धजत नसे. जातिभेद हा या देशाला असा घातक ठरलेला आहे. त्यामुळे समाज व्यक्तिस्वातंत्र्याची जोपासना करू शकला नाही आणि प्रत्येक मनुष्य कळपातला एक घटक, असाच राहिला. तो व्यक्ती या पदवीला गेलाच नाही. त्यामुळे विद्या, कला, शास्त्रे, व्यापार, उद्योग, या सर्वाचा लोप होऊन अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य या नरकात तो दीर्घकाल पिचत राहिला.

पुराणवर्चस्व
 निवृत्ती आणि जातिभेद यांच्याइतकेच भारतीयांच्या अवनतीचे, तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्या मनावरील पुराणवर्चस्व हे होय. या वर्चस्वामुळे वास्तव जगापासून मनाने हिंदुलोक फार दूर गेले. इतिहास भूगोल या कल्पनाच त्यांच्या मनातून नाहीशा झाल्या. पश्चात्य लोक जगप्रवास करीत असताना, नवखंड पृथ्वी व दहावे खंड काशी, असा भारतीयांचा भूगोल होता. आणि उन्नती, अवनती, जय, पराजय, उत्कर्षापकर्ष हे सर्व पापपुण्यामुळे, दैवयोगाने, परमेश्वरी इच्छेने घडत असते ही त्यांची ऐतिहासिक घडामोडींची मीमांसा होती. याच वेळी युरोपात कार्यकारणभावाचा अभ्यास चालू झाला होता आणि सर्व घडामोडींची त्याअन्वये मीमांसा होऊ लागली होती. भारतात लोकहितवादींच्या काळापर्यंत, पूर्वी रावण मातला होता तसेच आता इंग्रज मातले आहेत, रामाने अवतार घेऊन रावणाचा नाश केला तसा इंग्रजांचाही नाश परमेश्वर अवतार घेऊन करील, अशी लोकांची श्रद्धा होती. कारण पुराणांत तशी वर्णने आहेत. रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये मुळात खूपच वास्तववादी आहेत. 'मी मानवी प्रयत्नाने रावणाचा वध केला आहे,' असे रामचंद्र म्हणतात. राम, सीता, पांडव, द्रौपदी, श्रीकृष्ण, त्यांच्या स्त्रिया यांचे मूळ काव्यात अत्यंत दुःखद शेवट झालेले दिसतात. पण असे दुःखद शेवट होऊच द्यावयाचे नाहीत, असा पुराणांचा कटाक्ष आहे. त्यासाठी त्यांनी शंकरपार्वतीची योजना केली आहे. हरिश्चंद्र, श्रियाळ, मार्केंडेय यांच्यावर कसलीही संकटे येवोत, शंकर त्यांना शेवटी सोडवितात. अंबरीष, प्रल्हाद, ध्रुव यांना विष्णू सोडवितात. रामायण, महाभारत यांतील अनेक घटनांचे मूळ स्वरूप बदलून पुराणिकांनी आणि पुढे प्राकृतभाषांतील लेखकांनी त्यांना परमेश्वरी चमत्कारांचे रूप देऊन टाकले आहे. रामाने सेतू बांधला तो दगड, माती, झाडे आणून साध्या मानवी प्रयत्नांनी बांधला, असे रामायणात आहे. पण रामनामामुळे दगड तरले, असे त्यांचे पुराणात चमत्काररूप आहे. मूळ रामायण आणि महाभारत मराठीत किंवा इतर प्राकृत भाषांत कोणी आणलेच नाही. अनेक