पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४५५
यशापयश-मीमांसा
 

कारभाराचे हे वैशिष्ट्य सांगितले आहे. मुलकी कारभारात लष्कराला, खुद्द सरनोबताला- सेनापतीला- सुद्धा ढवळाढवळ करण्याचा मुळीच अधिकार नव्हता. छत्रपतींनी ते कधीच सहन केले नसते, असे ते म्हणतात. रामचंद्रपंत अमात्य यांनीही हेच तत्त्व सांगितले आहे. 'संपूर्ण राज्यभार, देशदुर्गाचा अखत्यार, सरकारकुनाचे (प्रधानाचे) हाती असावा. सेनानायक त्या अधीन करावे.'

कर्तबगार माणसे
 शिवछत्रपतींनी राज्याची आठ अंगे करून कारभाराची योजना आखली आणि ती पार पाडण्यासाठी अत्यंत लायक व कार्यक्षम असेच प्रधान नेमले. त्यांनी पुढीलप्रमाणे कार्यक्षेत्रे आखून दिली होती. (१) पंतप्रधान (पेशवा) याने सर्व राज्यकार्य करावे. राजपत्रावर शिक्का करावा. सेना घेऊन युद्धप्रसंग व स्वारी करावी. तालुका ताब्यात येईल तो रक्षून चालावे. (२) पंत अमात्य (मुजुमदार) याने सर्व राज्यातील जमाखर्चाची चौकशी करावी. फडनिशी पत्रावर निशाण करावे, युद्धप्रसंग करावे. सर्व लष्करी व मुलकी खात्यांचे हिशेब याने तपासावे. (३) सचीव (सुरनीस) याने सर्व राजपत्रांचा शोध घेऊन मजकूर शुद्ध करावा आणि एकंदर सर्व सरकारी दप्तराची व्यवस्था पहावी. (४) मंत्री (वाकनीस) याच्या ताब्यात अठरा कारखाने व बारा महाल यांचा कारभार असून खाजगीकडील दप्तर व पत्रव्यवहार याच्याचकडे असे. (५) सेनापती (सरनोबत) याचा अधिकार सर्व लष्करावर चाले. एकंदर फौजच्या शिस्तीची जबाबदारी त्याजवर असे. (६) सुमंत (डबीर) परराज्याशी होणाऱ्या सर्व व्यवहाराची कामे याच्याकडे असत. (७) न्यायाधीश - याच्याकडे सर्व न्यायखाते होते. (८) पंडितराव- शास्त्रार्थ सांगणे, देवस्थाने, दानधर्म यांची व्यवस्था याच्याकडे होती. या आठ पदांवर नेमलेले अधिकारी- मोरोपंत पिंगळे, रामचंद्रपंत अमात्य बावडेकर, अनाजी दत्तो प्रभुणीकर, दत्ताजी त्रिमल, हंबीरराव मोहिते, जनार्दनपंत हणमंते, निराजी रावजी, रघुनाथभट्ट उपाध्ये- हे सर्व कर्तबगार होते. महाराज माणसांची निवड अत्यंत कसोशीने व दक्षतेने करीत. कर्तृत्व, गुणसंपदा ही एकच कसोटी ते लावीत, वंशपरंपरेने कोणतीही जागा कधीही कोणालाही देत नसत, वतन किंवा जहागीरही देत नसत आणि नेमलेल्या अधिकाऱ्यांस भरपूर पगार देत असत. पंतप्रधान पेशवा याला पंधरा हजार होन म्हणजे सालीना ५२००० रु. मिळत. त्या वेळचे बाजारभाव ध्यानात घेता हा पगार आजच्या दसपट होता. या अष्टप्रधानांपैकी काही प्रधान समर्थ रामदासांचे शिष्य होते. आणि महाराजांच्यावर त्यांची अनन्यभक्ती होती. त्यामुळेच त्यांनी तनमनधनाने झिजून उत्तम राज्यकारभार केला आणि महाराष्ट्रात नवी सृष्टी निर्माण केली.

न्यायपद्धती
 छत्रपतींच्या राज्यकारभाराचे अंतिम उद्दिष्ट लोकसुख, लोककल्याण हे होते, हे वर