पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४५४
 


सत्तानियंत्रण
 लोकसुख, राष्ट्रहित, प्रजाकल्याण हा जसा अष्टप्रधान मंडळाच्या स्थापनेमागे एक हेतू होता तसाच दुसराही एक महत्त्वाचा हेतू होती. राजसत्तेवर नियंत्रण घालणे हा तो हेतू होय. सामान्यतः लोक जागृत झाले की राजसत्तेवर नियंत्रण येते. पण येथे छत्रपतींनी स्वतःहून प्रधानमंडळ नेमून स्वतःच्या सत्तेवर मर्यादा घातली होती. नानासाहेबांनी यासाठी छत्रपतींचा फार गौरव केला आहे. ते म्हणतात, असा स्वतःवर आपला आपण दाब ठेवून येणे, मनाचे विशिष्ट औदार्य असल्याशिवाय होत नाही. असे औदार्य एकाही मुसलमान बादशहात नव्हते. इंग्लंडच्या राजातही ते बेताचेच होते.' (वरील ग्रंथ, पृ. ४५९)

हत्तीचे अंकुश
 रामचंद्रपंत अमात्य यांनी प्रधानांचे महत्त्व सांगितले आहे. त्यात, 'प्रधान म्हणजे हत्तींचे अंकुश', असेच त्यांचे वर्णन केले आहे. ते म्हणतात, 'प्रधान म्हणजे राज्यलक्षणगृहाचे स्तंभ आहेत. प्रधान म्हणजे नृपसत्ताप्रसारक, प्रधान म्हणजे प्रजापालन, धर्मसंरक्षणाचे अध्यक्ष, प्रधान म्हणजे राजमदजनित अन्यायसागराची मर्यादा, प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश, प्रधानापेक्षा राजेलोकांस इतर आप्त व अधिकोत्तर किमपि नाही; म्हणून प्रधानांची भीड राजांनी सर्वोपेक्षा अधिकोत्तर वागवावी आपले शासनाप्रमाणेच त्यांचे शासन सकळांवर चालवावे. समयविशेषे आपला आग्रह सोडून त्यांचा शब्द चालविलासा करावा.' स्वसत्तेला आपण होऊन मर्यादा घालण्याची ही वृत्ती ! यालाच संस्कृती म्हणतात.

दिवाणी सत्ता
 अष्टप्रधानांची नेमणूक करून महाराजांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट साधली. 'सामान्यतः कोणत्याही देशाच्या कारभारात लष्करी व दिवाणी अशी दोन अंगे मुख्य असतात. प्रथमतः अंतर्बाह्य शांततारक्षणासाठी लष्करी अंगाची जरूर असते. पण हे अंग प्रधान नव्हे. लोकसुखाचे साधन दिवाणी कारभारावर अवलंबून असते. ज्या राज्यात लष्करी सत्ता दिवाणी सत्तेच्या ताब्यात असते, त्या राज्यात लोकसुखाची मर्यादा अत्यंत वाढलेली असते. मोगल बादशाहीचा कारभार बहुतेक लष्करी स्वरूपाचा होता. लष्करी जोरावर लोकांकडून पैसे वसूल करणे, हे प्रांताच्या लष्करी सुभेदाराचे मुख्य काम असे. परंतु शिवछत्रपतींनी राज्यकारभाराची व्यवस्था ठरविली, तेव्हा त्यांनी लष्करी धोरणास अगदी मागे ठेविले. आठ प्रधानांपैकी एकच प्रधान लष्करी ठेविला. इतर सहा प्रधानांस जरी लष्करी काम करावे लागत असे तरी, त्या प्रधानांचे मुख्य कार्य दिवाणी कारभारक्षेत्रातले होते. छत्रपती तेच आपले मुख्य कार्य समजत असत.' नानासाहेबांप्रमाणे डॉ. सेन यांनीही छत्रपतींच्या राज्य-