पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
४३०
 

आहे, असे महाराष्ट्र समाजाला जाणवू लागले. आणि महाराज स्वतः त्यांच्यांत मिसळून त्यांना हे त्यांचेच राज्य आहे अशी शिकवण देत राहिल्यामुळे हे 'मऱ्हाष्ट्र राज्य' आहे अशी अस्मिता त्यांच्या ठायी निर्माण झाली. हिंदुस्थानात ही अगदी असामान्य घटना घडली. आपण मराठे तेवढे निराळे, आपण मराठे तेवढे एक राष्ट्र, असा भाव भारतात अन्यत्र कोठेही निर्माण झाला नव्हता. बंगाली तेवढा मेळवावा, गुजराथी तेवढा मेळवावा, आपण पंजाबी, आपण आसामी, अशी पृथक् अहंकाराची जाणीव इतर प्रांतांत केव्हाही उदय पावली नाही. रजपूत येवढे पराक्रमी आपण रजपूत निराळे आहो, अशी भावनाही त्यांच्या ठायी होती. पण ती वंशनिष्ठा होती. भूमिनिष्ठा नव्हती. राजस्थानातील प्रत्येक माणूस रजपूत आहे असा आशय, 'आम्ही रजपूत' या भावनेत नव्हता. तेथल्या जोधपूर, जयपूर, चितोड अशा राजघराण्यांपुरतीच ती मर्यादित होती आणि तीही ऐक्यप्रेरक होऊ शकली नाही. कारण प्रत्येक घराणे दुसऱ्या घराण्याला तुच्छ लेखीत असे. मग सर्व जनतेला सम मानणे हे तर लांबच राहिले.

लोकांविषयी तुच्छता
 भारतातच काय, पण अतिशय प्रगत अशा पश्चिम युरोपातही, राज्य लोकांचे असते, जनतेचे असते, लोक ही एक शक्ती आहे, या तत्त्वाचा परिपोष, चौदाव्या, पंधराव्या शतकात, तेथे राष्ट्रभावनेचा उदय झाला असूनही, एक इंग्लंडचा अपवाद सोडता, एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत झाला नव्हता. १८४८ साली जर्मनीत अडतीस भिन्न स्वतंत्र संस्थाने होती. त्या वेळी प्रशियाचा राजा फ्रेडरिक विल्यम ४ था हा चांगला प्रबळ होता. त्याच्या आधिपत्याखाली सर्व जर्मनीचे ऐक्य करावे अशी लोकांची इच्छा होती. फ्रॅकफुर्टच्या लोकसभेने तसा ठराव केला व फेडरिकला सर्व जर्मनीचे सम्राटपद देऊ केले. पण ते त्याने अत्यंत तुच्छतापूर्वक नाकारले. कारण काय ? तो म्हणाला, 'लोकांनी दिलेले राजपद मी तुच्छ मानतो. झालो तर मी माझ्या बळावर राजा होईन.' चौदाव्या लुईच्या कारकीर्दीत (१६६१ ते १७१५) फ्रान्सचा मोठा उत्कर्ष होत होता. पण समाजात कमालीची विषमता होती. लोकांना कसलेही स्थान नव्हते आणि त्यांची कमालीची पिळणूक होत होती. फ्रेंच राज्यक्रांतीचा स्फोट त्यामुळेच झाला. इटली, स्पेन या देशांत अजूनही लोकशक्ती जागृत नाही व संघटितही नाही.

निस्तुल गोष्ट
 अशा स्थितीत सतराव्या शतकात मराठ्यांच्या एका नेत्याच्या मनात लोकजागृतीची कल्पना उद्भवावी आणि त्याने लोकांत ती काही अंशी रुजवून त्यांच्या ठायी 'हे आपले मऱ्हाष्ट्र राज्य आहे' अशी अस्मिता निर्माण करावी ही एक अनन्यसामान्य, निस्तुल अशी गोष्ट आहे. त्या तत्त्वाचा परिपोष पुढे झाला नाही हे दुर्दैवच होय. तरी