पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३५६
 

फोडावयाचे, आपले अवगुण, आपला आळस, आपला गलथानपणा यांचा क्षणमात्र विचार करावयाचा नाही, या दैववादी लोकांच्या प्रवृत्तीवर समर्थांनी प्रारंभीच कडक टीका केली आहे. (प्रयत्न निरूपण, दासबोध, १२-२) ते म्हणतात, संसारात एक सुखी होतो, एक दुःखी होतो. याचे कारण सांगताना लोक 'प्रारब्धावरी घालिती.' आपल्या हातून अचूक यत्न होत नाही, म्हणून आपल्याला यश येत नाही, आपल्या ठायी अवगुण आहेत, म्हणून 'केले ते सजेना,' हे लोक जाणत नाहीत. 'दुसऱ्यास शब्द ठेवणे, आपला कैपक्ष घेणे, पाहों जाता लौकिक लक्षणे, बहुतेक ऐसी.' आपल्या पराभवासाठी दैवाला, नाही तर दुसऱ्या कोणाला तरी जबाबदार धरण्याचीच बहुतेकांची वृत्ती असते. पण हे सर्व चूक आहे. आपण पुरेसा प्रयत्न करीत नाही, हेच खरे कारण असते. गुण अनेकांच्या ठायी असतात, पण प्रयत्न नसेल तर त्यांचा उपयोग काय ? 'जेवरी चंदन झिजेना । तंवरी सुगंध कळेना.' त्यामुळे इतर वृक्ष व चंदन हे सारखेच ठरतात. म्हणून माणसाने झिजले पाहिजे. 'येत्न सिकवण' या समासात (१३,९) पुन्हा समर्थांनी हाच विचार मांडला आहे. काही माणसांना खायला अन्न नसते, वस्त्र नसते, इष्ट मित्रांचा आधार नसतो. त्यांनी काय करावे ? कसे जगावे ? असा प्रश्न करून त्यांनी स्वतः उत्तर दिले आहे-

लहान थोर काम काही । केल्यावीण होत नाही ।
करंट्या सावध पाही । सदेव होसी ॥

अंतरी नाही सावधानता, येत्न ठाकेना पुरता, सुखसंतोषाची वार्ता, तेथे कैची ? म्हणोनि आळस सोडावा, आणि यत्न साक्षेपे जोडावा !

चातुर्य
 स्वतःच्या प्रयत्नाने सद्गुण अंगी बाणविणे, अवगुण टाळणे आणि वैभवास चढणे हेच समर्थांच्या मते, चातुर्याचे लक्षण आहे (दास. १४, ६). ते म्हणतात, काळा वर्ण, मुकेपणा, आंधळेपणा, तसेच रूप लावण्य हे आपल्या हाती नाही हे खरे. पण 'अवगुण सोडिता जाती, उत्तम गुण अभ्यासिता येती ॥ मूर्खपण सांडिता जाते, शहाणपण सिकता येते, कारभार करिता उमजते, सकळ काही ॥', 'मान्यता आवडे जीवी, तरी का उपेक्षा करावी ? चातुर्येवीण उंच पदवी, कदापि नाही ॥' म्हणून लोकांनी प्रचंड व्याप उभा करावा, त्यासारखा उद्योग करावा, आणि मग - 'जितुका व्याप तितुके वैभव, हे प्रगटचि आहे.'
 निवृत्तिवादी बहुसंख्य माणसे सर्वत्र आळशी, निरुद्योगी असतात. कारण बहुधा निवृत्तिवाद, कर्मवाद व प्रारब्धवाद यांची सांगडच असते. ऐहिक ऐश्वर्याच्या आकांक्षावाचून, लोभ, मोह, वासना यांवाचून, सामान्य जनांना उद्योगाची प्रेरणा मिळत नाही. म्हणून समर्थ सारखे राजवैभव, लक्ष्मी यांच्या आकांक्षा जागृत करतात. 'बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, समस्ती बरे म्हणावे, ऐसी वासना आहे ना तुम्हांला ? मग तन्हे, मने झिजावे.'