पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३५५
महाराष्ट्रधर्म
 

युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥

शक्तीचे महत्त्व आणखी विशद करताना समर्थ म्हणतात,

मुक्त केल्या देव कोटी । सर्वही शक्तीच्या बळे ॥

देवांच्या ठायी अद्भुत दैवी सामर्थ्य असते. पण रावणाने त्यांना बंदीत घातले असता रामाला मानवी बलाचा, लष्करी सामर्थ्याचा, शक्तीचाच उपयोग करावा लागला ! शक्तीचे माहात्म्य असे आहे. महाराष्ट्रधर्म हा भागवतधर्माहून वेगळा झाला तो या शक्तीच्या उपासनेमुळे. डॉ. पेंडसे यांनी म्हटल्याप्रमाणे, भागवतधर्माचे केवळ संरक्षक धोरण होते ते टाकून महाराष्ट्र धर्माने चढाऊ व लढाऊ रूप धारण केले, याचा अर्थ हा आहे. त्याने शक्तीची उपासना घेतली. कारण त्याला म्लेंच्छसंहार करून राज्यस्थापना करावयाची होती प्रपंचात शक्तीचे असे अनन्य महत्त्व असल्यामुळेच समर्थांनी शक्तीच्या उपासनेला आणि त्यासाठीच धनुर्धारी श्रीरामचन्द्राच्या व हनुमंताच्या उपासनेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यांच्या महाराष्ट्रधर्माचे हे चौथे लक्षण होय.

(५) यत्नदेव
 प्रयत्नवाद हे त्याचे पाचवे लक्षण होय. 'यत्न तो देव जाणावा', 'यत्नाचा लोक भाग्याचा । यत्नेवीण दरिद्रता', 'करील यत्न जीतुका । तयास लाभ तीतुका ॥' ही समर्थांची वचने प्रसिद्धच आहेत. यांवरून ते पराकाष्ठेचे प्रयत्नवादी होते हे उघडच आहे. पण त्यांच्या या वचनांचा आशय दिसतो त्यापेक्षा फार मोठा आहे. तो आपण नीट समजावून घेतला पाहिजे. प्रयत्नवाद हे समर्थांचे ऐहिक प्रपंचाचे एक व्यापक तत्त्वज्ञान आहे. आणि त्यात सावधपणा, साक्षेप, विवेक, जाणपण, प्रत्यय, प्रचीती, बुद्धियोग एवढ्या गुणांचा समावेश होतो. भागवतधर्मीय संत हे बव्हंशी प्रारब्धवादी होते. त्यांनीही कष्ट, सायास, प्रयत्न यांचा उपदेश केला आहे, नाही असे नाही. पण तो परमार्थ क्षेत्रात. 'असाध्य ते साध्य करिता सायास ।' ही तुकारामाची वाणी सर्वश्रुतच आहे. पण मोक्ष, परमार्थ हेच त्यांचे उद्दिष्ट असल्यामुळे ऐहिक प्रपंच हा बहुधा त्यांनी प्रारब्धावरच सोपविला आहे. वारकरीपंथाची कर्मतत्त्वावर पूर्ण श्रद्धा होती. पण 'कर्मरेखा, कपाळीची रेघ, प्रयत्नाने पुसता येते' असा समर्थाचा सिद्धांत आहे. ते म्हणतात, 'ही गोष्ट वेळोवेळी प्रत्ययास येत असताना तिच्याकडे डोळेझाक काय म्हणून करावी ?' (दास १५-६) आणि ती रेखा पुसण्यासाठीच साक्षेप, विवेक, बुद्धियोग इ. गुणांची आवश्यकता आहे. तेव्हा भागवतधर्मीय प्रयत्नवाद आणि समर्थांचा प्रयत्नवाद यांत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. हे ध्यानी घेऊन त्यांची आपण नीट चिकित्सा केली पाहिजे.

केल्यावीण होत नाही
 आपली दुःखे, आपले अपयश, आपले दारिद्र्य यांचे खापर दैवावर, प्रारब्धावर