पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१०
 

त्यांची भिन्न संस्कृती ती तीच. पण त्यांच्यांतील मुख्य भेदकारण भाषा हेच आहे. धर्म, वंश ही भेदकारणे याला मुळीच प्रेरक झालेली नाहीत. लो. टिळकांनी म्हटले आहे की नर्मदेच्या दक्षिणेकडे महाराष्ट्र कर्नाटक असे जे भेद झालेले दिसतात ने पिंडान्वयापेक्षा भाषान्वयानेच झालेले आहेत. कन्नड व मराठे यांच्यांत रक्तभेद-वंश- भेद मुळीच नाही. धर्मभेद तर नाहीच नाही. तीच गोष्ट उत्तरेतील प्रदेशांची आहे. त्यांच्यांतील काही प्रदेशांतील समाजात भिन्न भिन्न रक्तांचे मिश्रण असेल. पण वंशतः अगदी भिन्न असा कोणताच समाज नाही. आणि त्या भेदामुळे ते प्रदेश भिन्न झाले, असे तर केव्हाच म्हणता येणार नाही. एवंच भारतीय संघराज्यातील घटक प्रदेश हे भाषाभेदामुळेच भिन्न झालेले आहेत यात वाद नाही. कानडी भाषिकांचा तो कर्नाटक व मराठी भाषिकांचा तो महाराष्ट्र असाच भाषाप्रदेशांचा अन्वय सर्वत्र आहे. तेव्हा याच धाग्याचा मागोवा घेत आपण मागल्या काळात प्रवास करीत जाऊन महाराष्ट्र च्या पृथगात्मतेचा आरंभबिंदू शोधणे हे फलदायी ठरण्याचा संभव आहे.
 मराठी भाषेत ग्रंथरचनेला प्रारंभ झाला तो इ. स. च्या बाराव्या शतकाच्या अखेरीस आणि तेराव्याच्या प्रारंभी. अर्थात तिची उत्पत्ती बोली भाषेच्या रूपात यापूर्वी दोनतीन शतके तरी झाली असलीच पाहिजे. तशी ती झाली असल्याचे पुरावे शिलालेखांत व 'कुवलयमाला' सारख्या प्राकृत ग्रंथात सापडतातही. पण अशा रीतीने तिचा प्रारंभकाल फार तर ८ व्या, १० व्या शतकापर्यंत नेता येईल. पण समाजाला, राष्ट्राला पृथगात्मता येण्याच्या दृष्टीने आपण हा शोध घेत आहो. तेव्हा त्या दृष्टीने ग्रंथरचना झाली तोच प्रारंभकाळ आपल्याला मानला पाहिजे. कारण भाषा बोलीच्या रूपात जोपर्यंत आहे तोपर्यंत तिला स्वतःला व तिच्यामुळे ती बोलणाऱ्या समाजाला अस्मिता प्राप्त होणे शक्य नसते. अर्थात या तिच्या स्वरूपाला नदीच्या उगमाप्रमाणे मह्त्त्व आहे यात शंका नाही. पण अशा दृष्टीने पाहिले तरी हा उगम दहाव्या शतकापलीकडे जात नाही. आणि आपल्याला तर त्याच्यापूर्वीच्या १३०० वर्षांच्या काळापर्यंत जावयाचे आहे. या मागल्या काळात महाराष्ट्राची, महाराष्ट्र समाजाची पृथगात्मता सिद्ध करण्यात भाषाभेदाचा आधार सापडेल काय ?
 सुदैवाने तसा आधार, तशी प्रमाणे आज उपलब्ध झाली आहेत.
 आजच्या भारतातील बहुतेक सर्व भाषा संस्कृतोद्भव आहेत असे ढोबळपणे मानले जाते. आणि ढोबळपणे ते खरेही आहे. म्हणजे त्यांचा मूळ उगम संस्कृतात सापडतो हे खरे आहे. पण आमची एकही भाषा प्रत्यक्ष संस्कृतातून उद्भवलेली नाही. ती संस्कृताची वंशज आहे इतकेच खरे आहे. आजची अनेक द्विजकुळे आम्ही रामाचे वंशज, कृष्णाचे, भृगूचे, भारद्वाजाचे वंशज असे सांगतात. त्याचा जो अर्थ तोच येथे घ्यावयाचा. रामाच्या कुळात ते जन्माला आले एवढाच जसा त्यांच्या विधानाचा अर्थ तसा या भाषा संस्कृतच्या कुळात जन्म पावल्या एवढाच अर्थ त्या भाषा संस्कृतोद्भव आहेत या विधानाचा आहे