पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्राची पृथगात्मता
 

एका नदीला आपण गंगा म्हणतो, दुसरीला यमुना म्हणतो, तिसरीला गोदावरी व चौथीला कृष्णा म्हणतो. असे का ? याचे कारण उघड आहे. प्रत्येक नदीचा प्रवाह अगदी भिन्न दिसत असतो. पण हे प्रवाह पाहिल्यामुळेच, प्रथम हे प्रवाह कोठे भिन्न झाले, हे आपल्याला पहावेसे वाटते. कारण मूळ पाणी एकच असले तरी, त्या त्या भूमीतील खनिजामुळे प्रत्येक नदीचे पाणी रंग, रुची, पाचकपणा, जडहलकेपणा, या गुणांच्या दृष्टीने भिन्नरूप झालेले असते. हे भिन्नरूप त्याला प्रथम कोठे प्राप्त झाले याचा शोध घेण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि मग हिमालयातील गंगोत्री, जम्नाेत्री, सह्याद्रीतील त्र्यंबकेश्वर, महाबळेश्वर ही त्या नद्यांची मूळस्थाने, हे त्यांचे उगम आपल्याला सापडतात व येथून गंगा सुरू झाली, येथून यमुना, येथून गोदा, येथून कृष्णा उगम पावली असे आपण निश्चित करतो. म्हणजे गोदा, कृष्णा यांची पृथगात्मता कोठून सुरू होते याचाच आपण शोध घेतो. या जलवाहिनींच्या प्रवाहांप्रमाणेच भिन्न संस्कृतींच्या प्रवाहाचा शोध घेण्याची आपल्याला जिज्ञासा वाटते; व तिच्यामुळेच कन्नड - संस्कृती, आंध्र-संस्कृती, महाराष्ट्र - संस्कृती यांच्या उगमाकडे आपण प्रवास करीत जातो. महाराष्ट्र - संस्कृतीविषयी तोच प्रयत्न आपल्याला करावयाचा आहे. या संस्कृतीचे त्र्यंबकेश्वर कोठे आहे ते आपल्याला हुडकून काढावयाचे आहे. पैठणनांदेडजवळ गोदावरीचा प्रवाह स्वच्छ निराळा दिसतो. तेथे शंकेला जागा राहत नाही. त्याचप्रमाणे तेराव्या शतकात महाराष्ट्र-संस्कृतीचा प्रवाह मुकुंदराज, चक्रधर, ज्ञानेश्वर, सिंघण, कृष्णदेव, रामदेवराव यादव यांच्या रूपाने स्वच्छ निराळा दिसतो. पण त्याच्याही मागे जाऊन या नदीचा उगम कोठे आहे, त्र्यंबकेश्वरापासून ज्याप्रमाणे गोदावरी निराळी झाली, पृथक झाली, तिचा स्वतंत्र प्रवाह सुरू झाला, असे म्हणता येते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी कोणत्या कालापासून म्हणता येईल ते. आपणास पहावयाचे आहे. आकाशातून पडणाऱ्या जलधारा प्रथम आकाशात सर्वत्र एकरूप, समगुण अशाच असतात. त्यांच्यांत परपस्परव्यवच्छेदकता नसते. त्याप्रमाणेच ताम्रपाषाणयुगाच्या अखेरपर्यंत म्हणजे इ. स. पू. १००० या काळापर्यंत महाराष्ट्रातील संस्कृतिधारा इतर भूप्रदेशांतील त्या युगातील धारांहून भिन्न नव्हत्या, त्या काळातील सर्व प्रदेशांतील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती एकरूप व समगुणच होत्या, असे उत्खननशास्त्राच्या आधारे आपण वर पाहिलेच आहे. तेव्हा त्यानंतरच्या काळात येऊन आपल्या त्र्यंबकेश्वराचा शोध कोठे लागतो का ते आता पहावयाचे आहे.

भाषा निर्णायक
 आज भारतीय संघराज्यातील प्रारंभी उल्लेखिलेले जे गुजराथ, बंगाल, कर्नाटक, आसाम, ओरिसा, महाराष्ट्र इ. प्रदेश ते भाषाभेदामुळे झाले आहेत हे आपण वर पाहिलेच आहे. या प्रत्येक प्रदेशाच्या परंपरा आता भिन्न झाल्या आहेत. आणि भाषेखेरीज इतरही अनेक कारणांमुळे त्यांना स्वतंत्र व्यक्तित्व प्राप्त झाले आहे.