पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३९
संतकार्य-चिकित्सा
 

होते. कर्नाटकात विद्यारण्य स्वामींनी हेच कार्य केले. हरिहर आणि बुक्क यांना स्वधर्मात परत घेऊन त्यांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला, प्रेरणा दिली. आणि त्या दोवा धनुर्धरांनी विजयनगरला स्वतंत्र राज्याची १३३६ साली स्थापनाही केली. संतांना हे करावयाचे असते तर महाराष्ट्रात हे सहज शक्य झाले असते. पण त्यांचे ते उद्दिष्टच नव्हते. म्हणून तर नामदेव येथून निघून पंजाबात गेले. आणि तेथेही त्यांनी भक्तिमार्गाचाच प्रसार केला. त्या वेळी पंजाबात तर अस्मानी सुलतानीच होती. पण नामदेवांनी त्याविषयी एक चकार शब्द काढला नाही. कारण, 'जळी बुडबुडे देखता देखता, क्षण न लागता दिसेनाती, तैसा हा संसार ।' अशी त्यांची धारणा होती. या भवसिंधूतून लोकांना तरून नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते. म्हणून श्रीकृष्णाच्या महाभारतातील राजधर्माचा विचार न करता त्याच्या बालक्रीडांचा महिमाच फक्त त्यांनी लोकांना सांगितला.

अध्यात्मरंग
 संतांनी देशकाल वर्णन करून प्रत्यक्षपणे राजधर्माचे प्रतिपादन कोठेही केलेले नाही. अप्रत्यक्षपणे, प्रसंगानुसार मागील कथा सांगताना, रामकृष्णांचे पराक्रम वर्णिताना, आणि गीतेतील कर्मयोगावर भाष्य करताना, क्षात्रधर्माचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यांनी शत्रूंचे निर्दाळण केले, असुरांचा संहार केला, अनाथांचे रक्षण केले, असे सांगून एकनाथांनी पराक्रमाची प्रेरणा दिली आहे. जे प्रजा पीडूनि कर घेती । जया नावडे धर्मनीती । ऐसे राजे भारभूत क्षिती । नेणो किती निर्दाळिले ॥ अबलांचे निजबळ राजा । तो राजचि स्वये नागवी प्रजा । ऐसा अनर्थ उपजे क्षितिभुजा । गरुडध्वजा न साहवे ॥ अशी श्रीकृष्णाच्या पराक्रमाची एकनाथांनी जागोजागी वर्णने केली आहेत. 'महालक्ष्मी' हे वीररसप्रधान काव्य लिहून एकनाथांनी क्षात्रधर्माला अशीच प्रेरणा दिली आहे. ही महालक्ष्मी आदिमाया आहे, महिषासुरमर्दिनी आहे. राम, कृष्ण, विठ्ठल हे तिचेच अवतार आहेत. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण यांचा संहार तिनेच केला, असे वर्णन दर कडव्याच्या शेवटी, 'बया दार उघड', (असे पालुपद घालून, या आदिमायेने भक्तांना आश्रय द्यावा अशी प्रार्थना केली आहे.)
 पण एकनाथांच्या या वीररसात एक मोठे वैगुण्य आहे. त्यांनी आपले सर्व प्रतिपादन आध्यात्मिक रूपकांच्या भाषेत केले आहे. काम, क्रोध म्हणजेच शंखासुर, हिरण्याक्ष, असे ते म्हणतात. रामकथा सांगताना अशी रूपके करण्याचे वास्तविक काही कारण नव्हते. पण राम म्हणजे परब्रह्म, कौशल्या म्हणजे सद्विद्या, कैकयी ही अविद्या, रावण म्हणजे वासनांचे जुंबाड, अशी रूपके ते करतात. त्यांच्या रामायणातील राम हा विश्वामित्रालाच व्याख्यान देतो आणि देह, तारुण्य, स्त्रिया यांची निंदा करतो. रामकथेला आणि इतरही कथांना असा सर्वत्र अध्यात्माचा रंग एकनाथांनी दिल्यामुळे त्यातील वास्तवता सर्व नष्ट झाली आहे.