पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
३२४
 


व्यवहारात
 संतांनी वर्णसमतेचा असा उपदेश केला असला, भेदाभेद हे अमंगळ आहेत असे सांगितले असले तरी, व्यवहारात, नित्याच्या जीवनात, वर्णभेद, जातिभेद आणि अस्पृश्यता हे सर्व भेद अत्यंत कटाक्षाने पाळले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. अंत्यजाचे, मातंगाचे घर दुरूनच टाळले पाहिजे, त्याच्या घराशी चुकून जरी संन्यासी गेला तरी त्याची त्याला लाज वाटली पाहिजे, अंत्यजाशी संभाषण करणेही वर्ज्य होय, असे ज्ञानेश्वरांचे मत होते (ज्ञानेश्वरी, १८-५४८, १६- १७६, १७- १०७). अत्यंत तामस असे ज्ञान कसे टाळावे ? आसुरी वृत्ती कशी निषिद्ध ? लज्जा शब्दाची व्याख्या काय ? याचे विवरण करताना वरील प्रकारचे दृष्टांत त्यांनी दिले आहेत. हे अंत्यजां विषयी झाले. शूद्रांविषयी तेच आहे. प्रत्येकाने स्वधर्म आचरावा. दुसऱ्याचा धर्म चांगला असला तरी तो त्याज्यच होय, हे समजावून देताना, ब्राह्मण दरिद्री असला तरी, त्याने शूद्राघरची उत्तम पक्कान्नेही त्याज्यच मानली पाहिजेत, असा दृष्टांत त्यांनी दिला आहे (३-२२१).
 वर्ण किंवा जाती या गुणांवरून मानाव्या असा विचार संतांनी कोठे कोठे मांडला असला, तरी तो फक्त भक्तीच्या क्षेत्रात. एरवी जाती किंवा वर्ण हे जन्मानेच ठरतात असे त्यांचे मत होते. 'गोरेया आंगा जैसे गोरेपण', गोरा रंग जसा जन्मतःच प्राप्त होतो, तो बदलता येत नाही, त्याचप्रमाणे 'वर्णाप्रमाणे आलेले कर्म करणीय', असे ज्ञानेश्वर म्हणतात (१८-८८७). या अठराव्या अध्यायातच प्रत्येक वर्णाची कर्मे सांगताना 'तीन वर्णाचे शुश्रूषण-सेवा-ते शूद्रकर्म' असेच त्यांनी सांगितले आहे. प्रत्येकाचा अधिकार हा जातिवश आहे, सहज आहे, तो शास्त्राने सांगितला आहे, आणि तोच प्रत्येकाने जाणून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, असे स्पष्टपणे त्यांनी म्हटले आहे (१८-८९१).

वेदी लागू नाही
 याचा अर्थ असा की संतांनी वर्णजातिसमता प्रतिपादिली असली तरी ती मोक्षमार्गातील अधिकारापुरती होती. पण याही बाबतीत ती समतापूर्ण नव्हती. ज्ञानेश्वर आणि एकनाथ यांनी, वेदांनी तीन वर्णानाच वेदशास्त्रांचा, यज्ञाचा अधिकार दिला म्हणून, वेदांवर टीका केली आहे. पण स्वतः त्यांनी, शूद्रांना तो अधिकार नाही, असेच म्हटले आहे. ज्ञानेश्वरांनी, 'क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण ब्राह्मणांच्याच तोलाचे आहेत, कारण त्यांना वैदिक धर्मक्रियांचा अधिकार आहे (ते वैदिकविधानी योग्य)', पण 'चौथा शूद्र जो धनंजया, वेदी लागु कीर नाही तया ॥ चौथा जो शूद्र वर्ण त्याला वेदाधिकार नाही', असेच सांगून ठेवले आहे (१८-८१९, ८२०). एकनाथांनीही 'वेदशास्त्रांचा अधिकारी ब्राह्मण, नामासि अधिकारी चारी वर्ण ॥' असा