पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/३३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०५
संतांचे कार्य
 

त्यांनी आपल्या वाणीने, लेखणीने, कर्तृत्वाने भारतालल्या प्राचीन वैदिक धर्मांचे, गीताधर्माचे पुनरुज्जीवन केले आणि त्या प्रलयापत्तीपासून या समाजाचे रक्षण केले. त्यांच्या त्या कार्याचे स्वरूप आता पाहावयाचे आहे.

(१) भक्तियोग
 या संतप्रणीत भागवतधर्माचे पहिले लक्षण म्हणजे 'भक्तियोग' हे होय. भक्तिमार्ग न म्हणता 'भक्तियोग' असे मुद्दामच म्हटले आहे. कारण भक्तियोगाचा येथे व्यापक आशय अभिप्रेत आहे. हे सर्व संत अद्वैतपथी होते. परमेश्वर हा निर्गुण निराकार असून तो चराचर असून तो चराचराला व्यापून राहिलेला आहे. मूर्तीमध्ये, प्रतिमेमध्ये परमेश्वर नसतो. मूर्ती हे उपासना करण्याचे साधन आहे. तिच्यात परमेश्वर आहे असे मानणे म्हणजे अनंत ईश्वराला अत्यंत लहान, संकुचित रूप देणे होय. मुळात परमात्मा प्राणिमात्राच्या ठायी आहे, सर्व भूतांच्या ठायी आहे. म्हणून या सर्व भूतांची भक्ती, या प्राणिमात्राच्या ठायी असलेल्या या परमेश्वराची सेवा म्हणजे खरी भक्ती होय, असा संतांचा सिद्धांत आहे. खरा भक्तियोग तो हाच होय. सर्व मानवतेची सेवा हाच संतांनी उपदेशिलेला श्रेष्ठ धर्म होय.

खरी भक्ती
 'भक्ति म्हणजे सर्वभूती । सप्रेम भजनयुक्ती ॥' असे एकनाथ म्हणतात. भूतजाताविषयी प्रेमाची भावना, हीच खरी भक्ती होय. 'सर्वाभूती भगवद्भजन॥' 'सर्वभूती भगवंत पाही, भूते भगवंताचे ठायी, तो भक्तामाजी अति श्रेष्ठ ॥', 'ज्यासि सर्वाभूती बुद्धि समान, तेचि भक्ती तेचि ज्ञान, तेचि स्वानंद समाधान, सत्य सज्ञान मानिती ॥', 'भगवद्भाव सर्वाभूती । या नाव गा अभेदभक्ती ॥' अशी वचने एकनाथी भागवतात ठायी ठायी आढळतात. मोक्षप्राप्तीसाठी भगवंताचे भजन, नामस्मरण, पादसेवन करणे हा जो साधा अर्थ भक्तिमार्ग या शब्दाने व्यक्त होतो, त्यापेक्षा हा अर्थ फार व्यापक आहे. सर्व भूतांच्या ठायी परमेश्वर आहे आणि अशा या परमेश्वराची सेवा करणे हीच भक्ती होय हा संतांच्या भक्तियोगाचा आशय आहे.

सृष्टजात वासुदेव
 ज्ञानेश्वरांनाही हाच भावार्थ ज्ञानेश्वरीत अनेकदा, अनेक ठिकाणी विवरून सांगितला आहे. 'हे समस्तही श्रीवासुदेवो, ऐसा प्रीतिरसाचा वोतला भावो, म्हणोनि भक्तां माजी रावो, आणि ज्ञानिया तोचि ॥' हे सर्व सृष्टजात वासुदेवच आहे असा भक्तिभाव, असा प्रेमभाव ज्याच्या अंतःकरणात दाटला आहे, तो सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ होय आणि खरा ज्ञानीही तोच होय, असे ते म्हणतात. 'सर्वाभूता अभिन्ना माते भजे -', 'जेणे ऐक्याचिये दिठी, सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी, तंतु एकु ॥' (सर्वभूतस्थितं मां २०