पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२७०
 


नेतृत्वाचे निकष
 अशा या त्रिविध नेतृत्वाचा आता विचार करावयाचा आहे. मुस्लिम आक्रमणाचा प्रतिकार करून स्वराज्य स्थापण्याचे प्रयत्न त्यांनी केले काय, त्या दृष्टीने समाजाला जागृत करून त्याला संघटनेचे तत्त्व या नेत्यांनी सांगितले काय, मुस्लिमांच्या क्रूर सत्तेच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या असहाय प्रजेचा दुःखभार हलका करण्याच्या दृष्टीने त्यांनी काय केले, 'धारणात् धर्म इत्याहुः।', 'प्रभवार्थाय भूतानां धर्मस्य नियमः कृतः' या प्राचीन काळच्या धर्माच्या व्याख्या ध्यानी घेऊन, लोकांचा प्रभव (उत्कर्ष), किंवा समाजाचे धारण पोषण करण्यास समर्थ असा धर्म यांनी उपदेशिला काय, हे व अशा तऱ्हेचे प्रश्न नेतृत्वाचा विचार करताना मनात उभे राहतात. नेतृत्वाचे ते निकषच होत. ते मनात ठेवूनच वर सांगितलेल्या विविध नेत्यांच्या कार्याचे निरीक्षण करावयाचे आहे.
 त्यांतील मराठा सरदार हा जो वर्ग, त्याच्या नेतृत्वाचा या प्रकरणात विचार करू आणि नंतर शास्त्रीपंडित आणि संत यांच्या कार्याचे एकेका प्रकरणात मूल्यमापन करू.

यवन सेना
 वर सांगितलेच आहे की यादव, निंबाळकर, सावंत, सुर्वे, शिरके, भोसले अशी अनेक सरदार घराणी बहामनी रियासतीत पराक्रम करीत होती. ही घराणी अस्सल क्षत्रियांची असून ती यादवांच्या कारकीर्दीत किंवा त्यांच्या पूर्वीही उत्तरेतून दक्षिणेत येऊन स्थायिक झाली होती. काही यादवांच्या काळात स्वपराक्रमाने उदयास आली होती बहामनी काळात यातील बहुतेक घराण्यांतले पुरुष पाचशेपासून पाच हजार स्वारांचे मनसबदार झालेले दिसतात. मुरार जगदेव, जगदेवराव पवार, लखूजी जाधवराव, मालोजी, शहाजी भोसले असे काही असामी तर आदिलशाही, निजामशाही या राज्यात सेनापतिपदापर्यंतही गेले होते. पण यांपैकी कोणीही केव्हाही मुस्लिम सत्ता नष्ट करून स्वराज्य स्थापण्याचा प्रयत्न केल्याचे आढळत नाही. सर्वांनी इमाने- इतबारे, राजीखुषीने, अक्कलहुषारीने सुलतानांची सेवा करून वतने, जहागिऱ्या, मनसबदाऱ्या या मिळविण्यातच धन्यता मानली असे दिसते.

घोरपडे
 गेल्या प्रकरणात भोसल्यांचे मूळ पुरुष सजनसिंह व त्याचा पुत्र दिलीपसिंह यांनी हसन गंगू यास बहामनी सत्ता स्थापन करण्यास साह्य केल्याचे सांगितलेच आहे. कर्णसिंह व भीमसिंह हे यांचेच वंशज. १४६९ साली बहामनी वजीर महंमद गवान याने कोकणात स्वारी केली, तेव्हा हे दोघे त्याच्याबरोबर होते. गुलबर्गा येथे बहामनी सत्ता स्थापन झाली तरी शंभर सव्वाशे वर्षे ती कोकण जिंकू शकली नव्हती. १४५३