पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२६५
बहामनी काल
 

शाह्यांची पडझड चालूच होती. पण तो उद्योग परकी, उपरी लोक करीत होते. या महाराष्ट्रभूमीचे धनी जे मराठे ते राज्यलक्ष्मीच्या मोहापासून सर्वस्वी अलिप्त होते !
 वर सांगितलेली नाना भेदकारणे, शक्तिक्षयकारणे या पाच शाह्यांना कशी नित्य ग्रासून राहिली होती याची कल्पना येण्यासाठी त्यांतल्या त्यात बलिष्ठ अशी जी विजापूरची आदिलशाही तिचा इतिहास थोडक्यात पाहू. त्यावरून शीतभात न्यायाने या पाचही सत्तांच्या विकलतेची परीक्षा होईल.

आदिलशाही
 यूसफ आदिलशहाने हे राज्य १४८९ साली स्थापन केले. तो १५१० साली वारला तेव्हा त्याचा मुलगा इस्माईल हा नऊ वर्षांचा होता. त्याचा पालक कमालखान याने या संधीचा फायदा घेऊन त्याला व त्याच्या आईला ठार मारण्याचे कारस्थान रचले. पण बेगम बुवजीखान हिने ते उलटवून त्यालाच ठार मारले. हे घोटाळे पाहून बेरीद, निजाम व इमाद या शाह्यांनी विजापूर बुडविण्याचा विचार करून त्यावर स्वारी केली. पण तीत त्यांचाच पराभव झाला. १५२५ साली बुऱ्हाण निजामशहाने पुन्हा विजापूरवर स्वारी केली. पण वजीर असदखान याने त्याचा पराभव केला. १५२९ साली इस्माइल आदिलशहाने बेदरवर स्वारी करून बेरीदशहाला पूर्ण नागविले. तेव्हा त्याच्या वतीने पुन्हा निजामशहा चालून आला. पण पुन्हा त्याचाच पराभव झाला. असदखान हा वजीर फार कर्तबगार होता. पण म्हणूनच इब्राहीम आदिलशहाने त्याला ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले. सुलतान व त्याचा वजीर यांचे हे वैमनस्य बघून निजामशहा व कुतुबशहा यांनी विजयनगरच्या साह्याने विजापूरवर स्वारी केली. (इ. स. १५४३). पण असदखानाने विजयनगर व निजामशहा यांशी स्वतंत्र तह करून त्यांना फोडले व कुतुबशहाचा पराभव केला. पण निजामशहाने मागून स्वारी करून इब्राहीमशहाचा पराभव केला. यामुळे इब्राहीम अगदी बेताल होऊन अनन्वित कृत्ये करू लागला. तेव्हा दरबारी लोकांनी त्याचा भाऊ अब्दुल्ला यास गादीवर बसविण्याचा कट केला. पण तो उघडकीस येऊन अब्दुल्ला व त्याचे पक्षपाती यांना पळून जावे लागले. यानंतर इब्राहीमशहाच्या क्रौर्याला ताळतंत्रच राहिले नाही. उपचारार्थ आलेल्या वैद्य लोकांनाही तो ठार मारू लागला. पुढील सुलतान अली आदिलशहा याने रामराजाच्या मदतीने निजामशाहीवर स्वारी केली व त्याचा मुलूख उजाड करून टाकला (इ. स. १५५८). पुढल्या वर्षी पुन्हा हुसेन निजामशहा चालून आला तेव्हा पुन्हा रामराजा व कुतुबशहा यांच्या मदतीने आदिलशहाने त्याचा मोड केला.
 या घटनांमुळे विजयनगरचा हिंदुराजा, रामराजा, हा एक दिवस आपल्या सर्वच शाह्या गिळंकृत करील, अशी सार्थ भीती या सुलतानांना वाटू लागली व त्यांनी धर्मासाठी ऐक्य करण्याचे ठरवून जिहाद पुकारला. त्याचे फल त्यांना मिळून १५५६ साली राक्षस तागडी येथे विजयनगरच्या सत्तेचा त्यांना नाश करता आला. पण हे ऐक्य फार दिवस