पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२५६
 

दरबारी ठेवून घेतले, मुजाहिदशहाने याचप्रमाणे अनेक इराणी व तुर्क सरदारांना आश्रय दिला आणि पुढील सुलतानांनी हेच धोरण ठेविल्यामुळे या परदेशाहून आलेल्या अरब, तुर्क, इराणी, अफगाण या मुस्लिमांचा एक स्वतंत्र पक्षच बनला व त्याला परदेशी असे नाव मिळाले. हे परदेशी लोक सहजगत्याच धाडशी असत. नाना देश पाहिल्यामुळे, संकटे भोगल्यामुळे, त्यांची बुद्धी चतुरस्त्र झालेली असे व कर्तबगारीही वाढलेली असे. त्यामुळे दक्षिण्यांना स्पर्धेत सहज मागे टाकून भराभर ते वरच्या जागा मिळवीत आणि सर्वत्र आपले वर्चस्व प्रस्थापीत. यामुळे दक्षिणी लोकात त्यांच्याविषयी तीव्र मत्सर व द्वेषभाव निर्माण होऊन त्यातून अनेक अनर्थ निर्माण झाले.

कत्तलखाना
 परदेशी यांनी आपल्याला शह दिला असून ते हळूहळू आपल्यावर मात करीत आहेत हे दक्षिण्यांच्या ध्यानी आले व या आपल्या शत्रूचा नाश करण्याची ते संधी पाहू लागले. १४३०–३१ साली बहामनी सुलतानांच्या गुजराथच्या सुलतानाशी तीन लढाया झाल्या. त्या तीहींतही बहामनींचा पराभव झाला. या सर्वाचे अपश्रेय परदेशी लोकांवर फोडून, दक्षिणी यांनी बादशहा वली याचे कान भरले. त्याला ते सर्व खरे वाटून त्याने परदेशी सरदारांना पदच्युत करून दक्षिण्यांच्या सर्वत्र नेमणुका केल्या. १४४६ साली खेळणा किल्ल्यावर बहामनी सेनापती खलफ हसन याने स्वारी केली. त्या वेळी तेथील राजे शंकरराव शिर्के यांनी संगमेश्वरचे राजे यांचे साह्य घेऊन हसन खानाची धूळधाण केली. बहामनी लष्करच कसेबसे जीव घेऊन, चाकणच्या किल्ल्यात येऊन राहिले. तेव्हा पुन्हा संधी साधून दक्षिणी यांनी, परदेशी यांच्या दगाबाजीमुळे व नालायकीमुळे हा पराभव झाला, असे सुलतान अल्लाउद्दिनशहा याच्या मनात भरवून दिले. लगेच त्याने हुकूम देऊन चाकणच्या किल्ल्यातील सर्व परदेशी लष्कराला बाहेर काढून त्याची कत्तल केली. पुढे तेथून सुटून आलेल्या परदेशी लोकांनी बादशहाला खरा प्रकार सांगितला. तेव्हा संतापून जाऊन त्याने दक्षिण्यांची तशीच कत्तल केली ! १४८२ साली सुलतानपदी आलेला महमूद हा अज्ञान होता. सर्व सत्ता दक्षिणी दिवाण मलिक नाईब याच्या हाती होती. आदल्या वर्षीच परदेशी वजीर महंमद गवान याला सुलतानाने ठार मारले होते. आता यूसफ अदिलखानासारख्या राहिलेल्या परदेशी सरदारांचाही काटा काढावा असा मलिक नाईब याने मनसुबा केला. पण ही बातमी बाहेर फुटली. आणि मग राजधानीमध्ये दोन्ही पक्षातील वैरानी भडकून वीस दिवसांपर्यंत उभयपक्षांत रणधुमाळी चालू होती. खून, कत्तली, रक्तपात यांनी नुसते थैमान मांडले होते. यानंतर मलिक नाईब याचाही खून होऊन हे सूडसत्र त्या वेळेपुरते संपले.