पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५५
बहामनी काल
 

ख्वाजाखानाने शहाच्या कानी लागून, निजाम उलमुल्क घुरी याने दगा दिल्यामुळे पराभव झाला, असे त्याच्या मनात भरविले. शहाने कसलाही शोध न करता, घुरी यास ठार मारले. पुढे ख्वाजाखानावर तोच प्रसंग आला. महंमद गवान व हा ख्वाजाखान यांच्यांत स्पर्धा निर्माण झाली. तेव्हा सुलतान महंमदशहा याच्या आईने ख्वाजाखानास ठार मारून तंटा मिटविला. महंमद गवान हा वजीर अत्यंत कर्तबगार होता. तो इमानी व एकनिष्ठही होता. त्याने राज्यव्यवस्था उत्तम ठेविली होती. पण यामुळेच दरबारी मंडळींच्या डोळ्यांत तो सलू लागला. त्यांनी गवानच्या सहीचे एक बनावट पत्र तयार केले. त्यात, बहामनी राज्याचा पिढीजात शत्रू जो ओढ्याचा राजा त्याला बहामनी राज्यावर स्वारी करण्यास चिथावणी दिली होती. असे बनावट पत्र तयार करून सरदारांनी ते सुलतान महंमदशहा याच्या हाती दिले. त्या वेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने लगेच महंमद गवान यास बोलावून घेतले व त्याची कैफियत ऐकूनही न घेता, आपल्या देखत त्या ७८ वर्षाच्या वृद्ध, कर्तबगार व अत्यंत इमानी वजिरास ठार मारविले ! कर्तबगार वजिरांना असे किडामुंगीप्रमाणे चिरडून टाकणारी सत्ता किती स्थिर व दृढ होऊ शकेल याचा अभ्यासकांनी विचार केला पाहिजे.

दक्षिणी व परदेशी
 वारसाचे कलह व सरदारांची गटबाजी यांच्या जोडीला दक्षिणी व परदेशी आणि सुनी व शिया हे वांशिक व धार्मिक भेद यांनी उत्पन्न झालेली वैरे, वैमनस्ये व कारस्थाने यांनी तर बहामनी राज्य नित्य हादरून जात असे. मागे सांगितलेच आहे की यादवांच्या कारकीर्दीतच उत्तरेकडील अनेक मुसलमान दक्षिणेत येऊन स्थायिक झाले होते. त्यांनी हिंदू स्त्रियांशी लग्नेही केली होती व हिंदूंना बाटविण्याचे कार्यही चालू ठेविले होते. पुढे मलिक काफूरने दक्षिणेची सर्व राज्ये बुडविल्यावर, ही मुस्लिमांची आयात मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि दक्षिणेत राज्यस्थापना झाल्यावर हे सर्व मुस्लिम येथे स्थायिक होऊन येथेच त्यांनी आपली घरेदारे केली. त्यामुळे त्यांचे बाह्यसंबंध सर्व तुटून त्यांच्या पुढील पिढ्या या एतद्देशीय म्हणजेच दक्षिणी झाल्या. पण इ. स. १३५० च्या सुमारास मुस्लिमांचा दुसराही एक ओघ महाराष्ट्रात येऊ लागला. अरबस्तान, इराण, अफगाणिस्तान, तुर्कस्तान या देशांतून मुस्लिम मुल्ला- मौलवी, विद्वान धर्मवेत्ते यांना अगत्याने पाचारण करून दरबारात आश्रय द्यावा, असे बहामनी शहाचे धोरण होते. येथे मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्यामुळे या वरील देशांतील अनेक धाडशी, साहसी पुरुष नशीब काढण्यासाठीही महाराष्ट्रात येत व आपल्या कर्तबगारीने दरबारात व लष्करात प्रतिष्ठेच्या जागा मिळवीत. अनेक अरबी व इराणी व्यापारीही याच सुमारास येऊ लागले व सुलतानांच्या आश्रयाने वर चढून पुढे राजकारणातही शिरू लागले. पहिला सुलतान जाफरखान याने महंमद तल्लखाच्या आश्रयास असलेल्या अनेक मोगल व अफगाण अमिरांची मने वळवून त्यांना