पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२४८
 

करून दिल्लीस नेले. तेथे पुन्हा एकदा मांडलिकत्व मान्य करून, रामदेवराव रायरायन हा किताब सुलतानाकडून घेऊन, परत आला. चार वर्षांनी १३११ साली तो मृत्यू पावल्यावर, त्याचा पुत्र शंकरदेव राजा झाला. त्याने दिल्लीचे जू झुगारून देण्याचे ठरवून खंडणी बंद केली. त्यामुळे मलिक काफूर पुन्हा देवगिरीवर १३१३ साली चालून आला. त्याने शंकरदेवास ठार मारले व देवगिरीचे राज्य दिल्लीला जोडून टाकले. त्यानंतर काफूर दोन वर्षे देवगिरीलाच होता. त्याने ते आपले मुख्य ठाणे केले होते व तेथून तो वरंगळ, द्वारसमुद्र, मदुरा या राज्यांवर स्वाऱ्या करीत असे. १३१५ साली दिल्लीला बंडाळ्या सुरू झाल्या म्हणून अल्लाउद्दिनाने त्याला परत बोलाविले. अल्लाउद्दिनाच्या मृत्यूनंतर मलिक काफूर याने त्याच्या मुलांना मारून स्वतः सुलतान होण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो स्वतःच मारला गेला आणि १३१६ साली मुबारक खिलजी हा सुलतान झाला. याच सुमारास रामदेवरावाचा जावई हरपाळदेव याने पुन्हा स्वातंत्र्य स्थापण्याचा प्रयत्न केला. तेव्हा १३१८ साली मुबारक खिलजी याने त्याच्यावर स्वारी करून त्याला जिवंत सोलून ठार मारले व यादवांचे राज्य खालसा केले.

बेसावध राजे
 या इतिहासावरून हे स्पष्ट होईल की यादवांचे राज्य जाऊन महाराष्ट्राला पारतंत्र्य आले ते केवळ योगायोगाने नव्हे. १२९६ पासून पुढल्या वीस बावीस वर्षात ओळीने चार वेळा यादवांचा रणात पराभव झाला. याचा अर्थच असा की स्वराज्य संभाळण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी नव्हते. १२९६ सालचा पहिला पराभव हा एखादे वेळी योगायोग म्हणता येईल. ते सुद्धा खरे नाही. उत्तर हिंदुस्थानात मुस्लिम टोळधाडी येऊ लागल्याला तीनशे वर्षे होऊन गेली होती. आणि दिल्ली येथे कुतुबुद्दिन ऐबक याने सुलतानी स्थापन केल्याला नव्वद वर्षे होऊन गेली होती. या नव्वद वर्षात उत्तर हिंदुस्थानातील, नेपाळचा अपवाद वजा जाता, एकूणएक प्रांत मुस्लिम आक्रमणास बळी पडून परतंत्र झाले होते. तेव्हा ही धाड आपल्यावर येईल याची कल्पना यादवराजांना यावयास हवी होती. पण नर्मदेच्या दक्षिणेस वरंगळचे काकतीय, द्वारसमुद्राचे होयसळ यादव व मदुरेचे पांड्य यांपैकी कोणालाही ती आली नाही. तशीच यादवांनाही नाही. ती सर्वच राज्ये १३०७ ते १३२१ या पंधरा वर्षात एकट्या मलिक काफूरने धुळीस मिळविली; यावरून स्वराज्य संभाळण्याची ऐपत त्यांपैकी कोणालाच नव्हती हे उघड आहे. यादवांची तीच गत होती. संकटाआधीच त्याची अपेक्षा करून सावध व्हावे, आणि सज्जता ठेवावी, हे तर या हिंदू सत्ताधीशांनी केले नाहीच, पण अल्लाउद्दिन स्वारीवर निघाला, म्हणजे प्रत्यक्ष संकट कोसळू लागले तरीही ते सावध झाले नाहीत. २६ फेब्रुवारी १२९६ या दिवशी अल्लाउद्दिन निघाला आणि महिना दीड महिन्याने देवगिरीस येऊन पोचला. यादवांचे हेरखाते कार्यक्षम असते