पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१२.
बहामनी काल
 



 सातवाहन ते यादव या कालखंडातील महाराष्ट्र संस्कृतीचे विवेचन गेल्या अकरा प्रकरणांत केले. आता बहामनी काल, मराठा काल, व ब्रिटिश काल असे तीन कालखंड राहिले. १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेथपर्यंत हा इतिहास द्यावयाचा आहे. वरील तीन कालखंडांपैकी आता बहामनी कालखंडाला प्रारंभ करू.

राजसत्तेचे स्वरूप
 बहामनी राज्याची स्थापना महाराष्ट्रात इ. स. १३४७ साली झाली. पण महाराष्ट्राचे स्वातंत्र्य १२९६ सालीच लोपले होते. तेव्हा या मधल्या अर्धशतकाच्या काळात येथे कोणता इतिहास घडत होता, तो कोण घडवीत होते, त्याच्यामागे प्रेरक शक्ती कोणत्या होत्या याचा विचार करून मग बहामनी राज्याचे स्वरूप वर्णन करणे युक्त होईल.

यादवांचा नाश
 १२९६ साली अल्लाउद्दिन खिलजी याने देवगिरीवर स्वारी केली, रामदेवराव यादव व त्याचा पुत्र शंकरदेव यांचा पराभव केला आणि अपार खंडणी व रामदेवरावाची कन्या घेऊन तो परत गेला. अशा रीतीने यादव मांडलिक झाले व या भूमीचे सातवाहनांच्या काळापासून दीड हजार वर्षे अखंड, अबाधित असलेले स्वातंत्र्य नष्ट झाले. पुढे रामदेवराव खंडणी देईनासा झाला म्हणून १३०७ साली मलिक काफूर या अल्लाउद्दिनाच्या सेनापतीने देवगिरीवर दुसरी स्वारी केली व रामदेवरावाला कैद