पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२२५
साहित्य, कला व विद्या
 

रचनेची प्रेरणाही दिली. 'महापुराण', 'नायकुमार चरिऊ ' ( नागकुमार चरित्र ) आणि 'जसहर चरिऊ' (यशोधर चरित्र) असे पुष्पदंताचे तीन ग्रंथ सध्या उपलब्ध आहेत. 'महापुराणा'चे आदी पुराण व उत्तर पुराण असे दोन भाग आहेत. यात एकंदर त्रेसष्ट जैन थोर पुरुषांची चरित्रे आहेत. आदी पुराणात पहिला तीर्थंकर ऋषभदेव याचे चरित्र आहे. उत्तर पुराणात राहिलेले तेवीस तीर्थकर आणि त्यांचे समकालीन महापुरुष यांची चरित्रे आहेत. दोन्ही खंड मिळून वीस हजार श्लोकसंख्या भरते. हा ग्रंथ लिहिण्यास पुष्पदंताला सहा वर्षे लागली. 'या ग्रंथात जे आहे तेच सर्वत्र आहे व यात जे नाही ते अन्यत्र कोठेही नाही' असे त्याने अभिमानाने लिहिले आहे. पुराणाच्या अनेक अध्यायांत त्याने आपला आश्रयदाता जो भरत त्याची प्रशस्ती गायिली आहे.
 'नायकुमार चरिऊ' हे एक खंडकाव्य असून त्यात पंचमीचा उपवास करणाऱ्या नागकुमाराचे चरित्र वर्णिलेले आहे. त्याच्या शेवटच्या संधीत - अध्यायात - सांख्य, मीमांसा, क्षणिकवाद, शून्यवाद, इ. दार्शनिक मतप्रणालींचे खंडन पुष्पदंताने केले आहे. त्यावरून त्याची गाढ विद्वत्ता दिसून येते. 'जसहर चरिऊ' हेही एक खंड- काव्य असून त्यात यशोधर नामक एका पुराण पुरुषाचे चरित्र वर्णिलेले आहे. हे खंडकाव्य म्हणजे पुष्पदंताच्या भाषाप्रभुत्वाचा उत्तम नमुनाच आहे. त्यात विरहाची व दारिद्र्याची सुंदर वर्णने आढळतात. समकालीन सामंत सरदारांवर या काव्यात पुष्पदंताने कठोर टीका केली आहे. हे काव्य इतके लोकप्रिय झाले की अनेक शैव पंडितांनी त्याचे संस्कृतात अनुवाद केले आहेत. नाथूराम प्रेमी यांनी पुष्पदंताबद्दल म्हटले आहे की पुष्पदंत हा अपभ्रंश भाषेचा महाकवी होता. त्याच्या काव्यातले ओज, प्रवाह, रस व सौंदर्य हे विशेष अन्यत्र दुर्लभ आहेत. त्याचे शब्दभांडार विशाल आहे. शब्दालंकार व अर्थालंकार या दोहींनी त्याचे काव्य समृद्ध आहे.

कनकामर
 अपभ्रंश मराठीतला दुसरा कवी म्हणजे कनकामर हा होय. हाही प्रारंभी ब्राह्मण असून पुढे जैनपंथी झाला. असई, तेर, धाराशीव इ. मराठवाड्यातील गावांचा तो उल्लेख करतो. ही गावे प्राचीन काळी राष्ट्रकूटांच्या राज्यात मोडत होती. याची भाषा यादवकालीन मराठींचे पूर्वरूप दाखविते. 'करंडक चरिऊ' हे त्याचे मुख्य काव्य. यात त्याने राष्ट्रकूटांनी जे विजय मिळविले त्यांचेच, इतर नावांनी, आपल्या काव्यात वर्णन केले आहे.
 धाडीवाहन हा चंपापुरीचा राजा आणि पद्मावती ही कुसुमपूरची राजकन्या. करंडक हा त्यांचा पुत्र. हा मोठा पराक्रमी असून त्याने विशाल साम्राज्य स्थापन केले होते. आयुष्याच्या शेवटी पुत्रावर राज्य सोपवून हा अरण्यात तपश्चर्येला निघून गेला. असे या काव्याचे कथानक आहे.
 १५