पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२०८
 

निराळ्या प्रसंगी राजाला नजराणे द्यावे लागत ते वेगळेच. उत्पन्नाच्या एकषष्ठांश कर आसवा असे स्मृतिकारांनी सांगितले आहे. पण अनेक वेळा हे कर वीसपंचवीस टक्क्यांपर्यंत असत असे इतिहासकार सांगतात.
 आर्थिक जीवनात प्रामुख्याने शेती, उद्योग व व्यापार यांचा अंतर्भाव होतो. उद्योगामध्ये कारागिरी व कारखानदारी येतात. कारखानदारी हा शब्द अलीकडचा आहे. आणि त्यावरून सूचित होणारे प्रचंड कारखाने त्या काळी नव्हते हे उघडच आहे. पण इषुकार, रत्नकार, रथकार, नौकाकार यांचे उल्लेख येतात. त्यावरून लहान प्रमाणावर का होईना, पण कारखानदारी त्या वेळी होती यात शंकाच नाही. त्याकाळचे जीवन समृद्ध होते आणि समृद्ध जीवन कारखानदारीवाचून चालणे शक्यच नाही.

कारागीर
 गाथासप्तशती व जातके यांवरून त्या काळचे औद्योगिक जीवन कसे होते याची कल्पना येते. सुतार, लोहार, चर्मकार, कुंभार, विणकर, गवळी, रंगारी, सोनार, गवंडी, नापित, माळी, तेली, तांबट हे ग्रामीण भागातले कारागीर होत. वर्षभर यांनी शेतकऱ्याचे काम करावे आणि भातमळणीच्या वेळी खळ्यावर जाऊन त्यांनी आपली वार्षिक मजुरी वसूल करावी अशी पद्धत त्या वेळी होती. हिंदुस्थानात परवा परवापर्यंत हीच पद्धत होती व अजूनही ती क्वचित कोठे असेलही.
 वर उल्लेखिलेली कारागिरी ही ग्रामीण भागातील होय. ती सामान्य व ओबडधोबड अशीच असणार. पण त्या वेळच्या जीवनाची जी वर्णने जातककथा, शिलालेख इतर कथा यांत आढळतात, जे जीवन कोरीव लेण्यांतील कलेवरून दिसून येते, त्यावरून नागर भागात ही कारागिरी पुष्कळच विकसित झाली होती याविषयी भरभक्कम पुरावा मिळतो.

कसबी कारागीर
 कंठा, हार, कर्णभूषणे, वलये, मेखला, नुपूर, कंकणे असे सर्व प्रकारचे दागिने स्त्रिया त्या वेळी वापरीत. लेण्यांतील चित्रांत ते पहावयास मिळतात आणि आता उत्खननात प्रत्यक्षातच ते सापडत आहेत. हे दागिने सोन्याचांदीचे आहेत, हिऱ्या- माणकांचे आहेत व मोत्यांचेही आहेत. रत्नांमध्ये नील, पद्मराग, मणी, मरकत, पाचू या रत्नांचे उल्लेख आहेत. सोन्याचे तर अगणित आहेत. यावरून सुवर्णकार, रत्नकार यांची कारागिरी फार उच्च प्रकारची होती हे उघडच आहे आणि यावरून सोने, हिरे, तांबे, लोखंड यांच्या समृद्ध खाणी महाराष्ट्रात होत्या आणि समुद्रातून मोती काढण्याचे कामही मोठ्या प्रमाणात चालत असे हे दिसून येते. लेण्यांमध्ये पटई, जाळ्या यांचे जे लाकूडकाम आहे ते कलेच्या सदरात येण्याजोगे आहे. दगडी कामही