पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



१०.
आर्थिक जीवन
 



आधारग्रंथ
 सातवाहन ते यादव या कालखंडातील धार्मिक जीवन आणि समाजरचना यांचा विचार झाला. आता त्या काळच्या आर्थिक जीवनाचा विचार करावयाचा. गाथासप्तशती हा सातवाहन काळचा गाथासंग्रह उपलब्ध आहे. कौटिल्याचे अर्थशास्त्र, महाभारत यांसारख्या ग्रंथांवरून काही माहिती मिळते. परकी प्रवाशांनी काही वर्णने लिहून ठेवली आहेत. या सर्वांवरून डॉ. मिराशी, डॉ. आळतेकर, डॉ. मुनशी इ. पंडितांनी या काळच्या आर्थिक जीवनाचे वर्णन केलेले आहे. सातवाहन काळच्या गाथासप्तशतीवरून महाराष्ट्राची विशिष्ट अशी माहिती मिळते म्हणून त्या ग्रंथाचे महत्त्व जास्त आहे. स. आ. जोगळेकरांनी गाथासप्तशतीचे मोठ्या परिश्रमाने संपादन केले आहे. त्यात त्या काळच्या महाराष्ट्राच्या आर्थिक जीवनाचे वर्णन दिलेले आहे.

शेती
 साधारणतः शंभर-सव्वाशे उंबरे असलेले खेडे - ग्राममध्यभागी, त्याच्या भोवती पिकाऊ जमीन, तिच्या पलीकडे गुरांना चरण्यासाठी कुरणे व त्यापलीकडे जंगले, अरण्ये अशी त्या वेळी ग्रामीण प्रदेशाची रचना असे.

शेतकरी
 शेतकरी साध्या लोखंडी नांगरानेच जमीन नांगरीत. नांगराला दोन बैल जोडलेले असत. अनेक ठिकाणी टोणगेही जोडीत. पुष्कळ शेतकऱ्यांची स्वतःची दोनचार एकरांची लहानशी जमीन असे. श्रीमंत शेतकऱ्यांची हजार एकरांपर्यंतही जमीन