पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१९४
 

राजवंश आपणांस क्षत्रिय म्हणवीत. आणि वेदशास्त्रपारंगत असे अनेक ब्राह्मण आचार्य त्यांचे पौरोहित्य करीत. त्यांच्या अश्वमेधासारख्या यज्ञालाही ब्राह्मणांची मान्यता होती. पण मुख्य म्हणजे कोणत्याही स्मृतींनी हा पुराणांचा दावा मान्य केला नाही. मागल्या शास्त्रकारांप्रमाणेच त्यांनी क्षत्रियांची कर्तव्ये इतर वर्णांप्रमाणेच सांगितली आहेत. मात्र येथून पुढल्या काळात एक गोष्ट दिसते. येथून पुढे पुराणधर्माचे वर्चस्व समाजावर बसू लागले. श्रुतिस्मृतीपेक्षा पुराणधर्म लोकांना जास्त मान्य होऊ लागला. त्याचा एक परिणाम असा झाला की ब्राह्मण हे क्षत्रियांची धर्मकृत्ये वेदमंत्राप्रमाणे न करता पुराणमंत्राप्रमाणे करू लागले. अकराव्या शतकातील मुस्लिम पंडित अल्बेरूणी याने हे लिहून ठेविले आहे. त्याच्या आधी किती काळ ही प्रथा पडली ते सांगणे कठीण आहे. पण या काळात क्षत्रिय वर्णाची प्रतिष्ठा मोठी असून ती या कालखंडाच्या अखेरपर्यंत टिकून होती असे दिसते.

वाणिज्य महत्त्व
 विद्येची उपासना हा ब्राह्मणांचा व्यवसाय, व समाजाचे संरक्षण हा क्षत्रियांचा. हे दोन उद्योग समाजधारणेस जितके अवश्य तितकाच धनोत्पादन हा वैश्य व्यवसायही अवश्य होय हे प्राचीन शास्त्रज्ञांनी चांगले जाणले होते. 'सर्व जग हे शेती व व्यापार यांवरच अवलंबून आहे, 'वार्तामूलो ह्ययं लोक:।', त्यामुळेच जगाचे पालनपोषण होत असते' असे महाभारतात म्हटले आहे (शांति ६८ - २५ ) कोशसंचयाचे महत्त्व युधिष्ठिराला सांगताना पितामह भीष्मांनी कृषिवाणिज्याचे महत्त्व विशद केले आहे. ते म्हणतात, 'हे राजा, कृषी, गोरक्ष व व्यापार आणि अशाच प्रकारचे दुसरे व्यवसाय लोकांकडून करवावे. हे उद्योग करणाऱ्यांना चोर किंवा अधिकारी यांच्यामुळे त्रास होत असेल तर त्यांमुळे राजा निंदेस पात्र होतो. राजाने अन्नपान व वस्त्रे यांच्या योगाने सदैव द्रव्यसंपन्न लोकांचा बहुमान करावा. हे भरतकुलोत्पन्ना, द्रव्यसंपन्न पुरुष हे राज्याचे मोठे अंग आहे. म्हणून तो सर्व प्राण्यांचे मूर्धस्थान होय, यात शंका नाही (ककुदं सर्व भूतानां धनस्थो नात्र संशयः । शां. ८८, ३० ). कृषि गोरक्ष्य वाणिज्यं लोकानां इहजीवनम् । शां । ८९, ७- शेती, पशुपालन व व्यापार यांवरच जगाची प्राणयात्रा अवलंबून असते हे सत्य महाभारतकार कधीही न विसरल्यामुळे, वैश्यांची मतेही त्यांनी कधी कमी लेखिली नाहीत. राजाच्या एकंदर ३७ मंत्र्यांपैकी २१ मंत्री वैश्य असावे असे त्यांनी सांगितल्याचे मागे म्हटलेच आहे. त्यावरून धनोत्पादन हा व्यवसाय व तो व्यवसाय करणारे वैश्य यांना समाजात त्या काळी मोटी प्रतिष्ठा होती हे स्पष्ट दिसते.

श्रेणी
 व्यापारी लोकांचे पूर्वी स्वतंत्र संघ असत. त्यांना श्रेणी किंवा पूग अशी नावे