पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१९३
समाजरचना
 

इतर ब्राह्मणांच्याप्रमाणेच मान व प्रतिष्ठाही मिळे. पल्लव राजांनी तर त्यांना अग्रहारही दिलेले आहेत. धर्मसूत्रांनी ( इ. स. पूर्व ६ वे शतक) ब्राह्मणांना शेती व व्यापार करण्यास परवानगी दिली आहे. पण ती मुनिमामार्फत, स्वतः नाही. पण राष्ट्रकूटकाळच्या स्मृतींनी असला आडपडदा ठेवलेला नाही. हारीत, पाराशर, आपस्तंब, बृहस्पती या स्मृतींनी व्यापार, शेती, लष्कर, सावकारी हे व्यवसाय ब्राह्मणांना आपद्धर्म म्हणून नव्हे, तर नित्याचे विहित म्हणून सांगितले आहेत आणि आपस्तंबाने तर सावकारी हा व्यवसाय ब्राह्मणांना आदर्श म्हणून सांगितला आहे (कित्ता, पृ. ३२७).

क्षात्रधर्म
 राज्य आणि युद्ध हा क्षत्रियांचा शास्त्रप्रणीत मुख्य व्यवसाय होय. आणि सातवाहन काळापासून यादव अखेरपर्यंत या दोन्ही क्षेत्रांत क्षत्रियांनी बहुमोल कार्य केले, हे इतिहासप्रसिद्ध आहे. चालुक्यांची दोन्ही घराणी - राष्ट्रकूट व यादव ही घराणी - क्षत्रिय होती. सातवाहन व वाकाटक यांच्या काळातही अनेक सेनापती क्षत्रियच होते. आणि सामंत घराणी तर बहुतेक क्षत्रिय होती. यजन, याजन इ. व्यवसायांखेरीज ब्राह्मणांना जसे स्मृतींनीच न्याय, मंत्रिपद इ. व्यवसाय सांगितले आहेत त्याप्रमाणे क्षत्रियांना सांगितलेले दिसत नाहीत. प्रजापालन, राज्यकारभार व युद्ध हाच त्यांचा शास्त्रमते एकमेव व्यवसाय होय. पण अशा शास्त्रवचनांना व्यवहारात फारसा अर्थ असणे कधीच शक्य नव्हते. कारण या व्यवसायात सर्व क्षत्रिय समाविष्ट होणे शक्यच नव्हते. आणि युद्ध हा सार्वकालिक उद्योग नसल्यामुळे तो कायमचा उपजीविकेचा व्यवसाय होणे केव्हाच शक्य नसते. कौटिल्याने कांबोज, सौराष्ट्र येथील क्षत्रियांचे वर्णन, वार्ताशस्त्रोपजीवी असे केले आहे. म्हणजे युद्धप्रसंगी ते क्षत्रिय शस्त्रावर उपजीविका करीत, पण एरवी शेती व व्यापार हाही व्यवसाय करीत असत. आपल्या कालखंडात हेच घडत असले पाहिजे. शिवाय महाभारत काळापासून सैन्यामध्ये सर्व क्षत्रियच असत असे नाही. ब्राह्मणांपासून शूद्रांपर्यंत सर्व वर्णाचे लोक लष्करात भरती होत. राष्ट्रकूटांच्या काळापर्यंत तर ही प्रथा निश्चित होती. तेव्हा क्षत्रियांना अन्य व्यवसाय करणे अपरिहार्यच होते. क्षत्रिय हे व्यापार व शेती करतात हे त्या काळच्या परकी प्रवाशांनी लिहून ठेविलेच आहे.
 कलियुगात क्षत्रियच नाहीत असा एक सिद्धान्त या काळात रूढ होऊ पहात होता. महानंदी हा शैशुनाग वंशातला राजा. महापद्मनंद हा त्याला एका शूद्र स्त्रीपासून झालेला मुलगा. या महापद्मनंदाने परशुरामाप्रमाणे सर्व क्षत्रियांचा संहार केला, असे पुराणे म्हणतात. याचा अर्थ असा की तेव्हापासून म्हणजे इ. पू. ४ थ्या शतकापासून भारतात क्षत्रियच नाहीत. विष्णुपुराण, मत्स्यपुराण ( काळ इ. स. ३०० ते ६०० ) या पुराणांत हा विचार मांडलेला आहे. याचा त्या काळी प्रत्यक्षात कसलाच परिणाम झालेला दिसत नाही. चालुक्य, राष्ट्रकूट आणि भारतातील इतर अनेक १३