पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
१५२
 


प्रवृत्ती निवृत्ती
 पण या तीन अंगांचे केवळ वर्णन करून भागणार नाही. धर्म ही एक महाशक्ती आहे. समाजाचा उत्कर्षापकर्ष बव्हंशी धर्मावर अवलंबून असतो. तेव्हा या दृष्टीने वरील तीन अंगांचे स्वरूपवर्णन व मूल्यमापन करणे अवश्य असते. तसे करावयाचे तर देशातील धर्मप्रणेत्यांनी धर्माचे अंतिम उद्दिष्ट काय मानले आहे, हे प्रथम पाहावे लागते. मोक्ष, संसारातून मुक्ती हेच बहुतेक सर्व धर्माचे ध्येय असते. पण त्या अंतिम उद्दिष्टाची साधना करताना इहलोकाकडे, प्रपंचाकडे, संसाराकडे धर्मवेत्ते कोणत्या दृष्टीने पाहतात, यावर समाजाचे भवितव्य अवलंबून असते. निःश्रेयस म्हणजे मोक्ष व अभ्युदय म्हणजे ऐहिक उत्कर्ष. धर्माने या दोहोंची चिंता वाहिली तर समाज बलाढ्य होतो, ऐश्वर्यशाली होतो. पण मोक्ष व प्रपंच यात नित्य विरोध आहे असे मानून, मोक्षासाठी प्रपंचाचा त्याग केला पाहिजे असा धर्माने उपदेश केला, संसार, स्त्री-पुत्र, राज्य, धनवैभव, यांची निंदा करून, हे सर्व वमनासारखे आहे असे सांगितले तर राष्ट्रीय प्रपंचाची हानी होते व समाजाचा अधःपात होतो. तेव्हा समाजात निवृत्तीचे प्राबल्य आहे की प्रवृत्तीचे हे पाहणे धर्माच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे.

बुद्धिप्रामाण्य
 धर्मामध्ये पुरुषबुद्धीला म्हणजे विचारस्वातंत्र्याला अवसर आहे की शब्दप्रामाण्य, वचनप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य यांनी मानवी बुद्धीला श्रृंखलाबद्ध केले आहे, यावर समाजाची प्रगतिपरागती अवलंबून असते. बुद्धीला अवसर असला की समाजातले धर्मधुरीण देशकालपरिस्थिती पाहून धर्मनियम बदलतात, म्हणजेच धर्मसुधारणा करतात. अशा धर्मपरिवर्तनावरच समाजाचा उत्कर्ष अवलंबून असतो. पण बुद्धीला तसा अवसर नसेल तर अवश्य व योग्य ते धर्मपरिवर्तन घडून येत नाही व समाजाचा अपकर्ष होतो. म्हणून शब्दप्रामाण्य व बुद्धिप्रामाण्य यांचा धार्मिक जीवनात अभ्यास करणे आवश्यक असते.

सापेक्ष दृष्टी
 नीती आणि आचार ही जी धर्माची दोन अंगे त्यांच्या दृष्टीने बुद्धिप्रामाण्याचे महत्त्व फारच आहे. सत्य, अहिंसा, भूतदया, क्षमाशीलता, आज्ञापालन ही नीतितत्त्वे सर्व धर्मात वंद्य पावलेली आहेत. पण यांचे मूल्य परिस्थितिसापेक्ष असते. गीतारहस्यातील 'कर्मजिज्ञासा' या प्रकरणात या तत्त्वांचा व्यवहारनिरपेक्ष विचार करणे कसे घातक ठरते ते लो. टिळकांनी उत्कृष्ट रीतीने दाखवून दिले आहे. पण अनेक समाजधुरीण सत्य-अहिंसादी नीतिमूल्ये निरपेक्ष मानतात. आचारधर्माविषयी असेच दोन पक्ष आहेत. नेहमीच असतात. धार्मिक आचार प्रथम रूढ केले जातात तेव्हा