पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२९
राजसत्ता
 

डॉ. आळतेकर म्हणतात, 'राष्ट्रकूटांचा राज्यकारभार अतिशय कार्यक्षम होता आणि त्यांच्या राजवटीत महाराष्ट्राचा नैतिक, सांस्कृतिक व भौतिक अशा सर्व दृष्टींनी उत्कर्ष होत गेला.' (पृ. ३९७-९८, ४१६-१७).

साम्राज्यातील प्रजा
 स्वराज्यातील प्रजेविषयी जे धोरण या राजपुरुषांचे होते तेच साम्राज्यातील प्रजेविषयी आणि जित राजांविषयी होते. याही बाबतीत धर्मशास्त्राच्या आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानल्या होत्या. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात असा दण्डकच घालून दिला आहे की ' विजेत्या सम्राटाने जित राजाचा प्रदेश, धन, स्त्रिया यांचा लोभ धरू नये. आणि त्याने मृत राजाच्या मुलाला त्याची गादी द्यावी. ' कौटिल्य म्हणतो की 'असा लोभ धरला तर त्या मृत राजाच्या भोवतालची राज्ये व तेथले राजे प्रक्षुब्ध होऊन जेत्याविरुद्ध उठतात.' याज्ञवल्क्य म्हणतो की ' जित प्रदेशातील प्रजेचे स्वराज्यातील प्रजेप्रमाणेच सम्राटाने पालन केले पाहिजे. त्याचप्रमाणे सम्राटाने त्या देशातील धर्म, रूढी, कायदे, रीती, परंपरा यांचा उच्छेद न करता त्यांचे यथायोग्य पालन करावे.' विष्णुधर्मसूत्र, अग्निपुराण, महाभारत, कात्यायनस्मृती यांत अशाच प्रकारच्या आज्ञा विजेत्या सम्राटाला केलेल्या आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की भारतातील बहुतेक विजेत्या सम्राटांनी त्यांचे निष्ठेने पालन केले, आहे. सम्राट समुद्रगुप्ताने अनेक जित राजांना पुन्हा त्यांच्या राजपदावर प्रस्थापित केले, म्हणून त्याची सर्वत्र कीर्ती झाली असे प्रयाग येथील विजयस्तंभावरील त्याच्या लेखात म्हटले आहे. ( काणे, धर्मशास्त्राचा इतिहास, खंड ३ रा, पृ. ७१ ). भारतातील प्राचीन काळच्या साम्राज्यांची यावरून कल्पना येईल. राज्य किंवा प्रदेश खालसा करणे, तेथील प्रजाजनांची कत्तल करणे, स्त्रिया व मुले यांना गुलाम म्हणून विकणे, धन- वित्तधान्य यांची लूट करणे किंवा त्यांचा विध्वंस करणे ही मुस्लिम सुलतानांची वा अर्वाचीन काळच्या फॅसिस्ट, नाझी, कम्युनिस्ट दण्डशहांची राजनीती त्या काळच्या चक्रवर्ती पुरुषांच्या स्वप्नातही नव्हती.
 मात्र जित राज्यातील प्रजेविषयीचे धर्मशास्त्राचे दण्डक महाराष्ट्रीय राजघराण्यांनी जरी काटेकोर पाळले असले तरी चक्रवर्तित्वाची आकांक्षा धरणाऱ्या सम्राटाने इतर राज्यांना जिंकावयाचे ते केवळ दिग्विजयासाठी, त्यांच्या राज्याचा अपहार करण्यासाठी नव्हे, हा दण्डक त्यांना तितक्या प्रमाणात पाळता आलेला नाही असे दिसते. सामान्यतः ती शास्त्राज्ञा ते पाळीत हे खरे. सातवाहनांचे साम्राज्य उत्तरेत मगधापासून दक्षिणेत कावेरीपर्यंत पसरलेले होते. पण त्यांनी कोणताही प्रदेश, तेथील राजवंश नष्ट करून, आपल्या राज्यास जोडला नव्हता. वाकाटक, चालुक्य यांनीही हे धोरण सांभाळले होते. चालुक्यसम्राट विक्रमादित्य २ रा याने कांचीचा पल्लवराजा नंदिपोत वर्मा यास रणात जिंकले. पण तरीही त्याच्या राजधानीचा त्याने विध्वंस केला नाही.