पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१५५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१२८
 

हरकत नाही. तो म्हणतो, 'साम्राज्य प्रस्थापित केल्यानंतर हर्षाने तीस वर्षे शांततेने राज्य केले. त्याचा कारभार चोख व न्यायाचा असे. सत्कृत्ये करताना झोप व अन्न यांचाही त्याला विसर पडे. आपल्या राज्यात त्याने सर्वत्र पांथस्थांसाठी धर्मशाळा बांधल्या होत्या. राज्यकारभार तो इतक्या दक्षतेने करी की त्याला सर्व दिवस अपुरा पडे. दर पाच वर्षांनी तो मोठा समारंभ करून आपले सर्व धन बौद्ध, ब्राह्मण, जैन व सर्वपंथीयांना अर्पण करी. आणि अशा रीतीने निर्धन झाल्यानंतर तो आपल्या अन्न-वस्त्रासाठी आपली बहीण राज्यश्री हिच्याजवळ भिक्षा मागे.' ( मध्ययुगीन भारत, भाग १ ला, प्र. ३६, ३७, ५०, ७४ ). ह्यूएनत्संगाच्या प्रवासवर्णनावरून, त्याने भारतातील अनेक राजे व त्यांचा राज्यकारभार याविषयी जी मते मांडली आहेत त्यांवरून, या कालखंडात भारतात राजसत्ता अनियंत्रित असली तरी येथल्या राजपुरुषांच्या मनावर विवेकाचे नियंत्रण फार मोठे होते आणि त्यामुळे 'राजा प्रकृतिरंजनात' हे वचन ते सार्थ करीत असत, हा ताम्रपट शिलालेखांवरून निघणारा निष्कर्ष बव्हंशी सत्य आहे, असे म्हणण्यास चिंता नाही.

सुखी प्रजा
 राष्ट्रकूट घराण्यात एकंदर १४ राजे होऊन गेले. त्यांपैकी नऊ राजे थोर आणि महापराक्रमी असे होते. हे वैभव अगदी असामान्य असे आहे. या घराण्यातील पहिला सम्राट दंतिदुर्ग याला तर कन्हय्यालाल मुनशी यांनी नेपोलियन म्हटले आहे. त्यानंतरचे कृष्ण, ध्रुवधारावर्ष, गोविंद ३रा, अमोघवर्ष १ ला, इंद्र ३ रा, कृष्ण ३ रा हे नृपती या वंशाला भूषणभूत झालेले आहेत. आपल्या वंशाचे साम्राज्य रामेश्वरापासून यमुनेपर्यंत स्थापिण्याचे कर्तृत्व तर यांच्या ठायी होतेच, पण विद्या, कृषी, व्यापार यांकडेही लक्ष पुरवून आपल्या राज्यात सुखसमृद्धी निर्माण करण्याविषयीही ते दक्ष असत. विहिरी, तळी, उद्याने, रुग्णालये, अनाथालये यांना त्यांचा उदार आश्रय होता. पाठशाळांचा योगक्षेम चालवून विद्येची उपासना करण्यास उत्तेजन देणे हे आपले कर्तव्य आहे, असे राष्ट्रकूट राजे मानीत असत. डॉ. अ. स. आळतेकर यांनी 'राष्ट्रकूट अँड देअर टाइम्स' या आपल्या ग्रंथात, राष्ट्रकूटांच्या काळच्या आर्थिक स्थितीचे फार तपशिलाने वर्णन केले आहे. त्या काळचे बाजारभाव, व्याजाचे दर, कामगारांचे वेतन यांचा अनेक शिलालेखांच्या व ताम्रपटांच्या आधारे अभ्यास करून, सुतार, लोहार, पाणक्ये, पहारेकरी यांनासुद्धा सुखाने अन्नवस्त्र मिळेल अशी वेतनश्रेणी त्या काळी होती, हे त्यांनी दाखवून दिले आहे. वरच्या वर्गांचे जीवनमान यापेक्षा जास्त संपन्न होते यात शंकाच नाही. राष्ट्रकूट राजांच्या साम्राज्यविस्तारासाठी सतत लढाया चालू असत. या लढायांचा प्रचंड खर्च भागवूनही त्यांनी प्रजेचे जीवनमान उंच ठेवण्यात यश मिळविले, त्या अथी धर्मशास्त्राची नियंत्रणे ते घटनाप्रधान व्यवस्थेतील नियंत्रणांपेक्षा जास्त मानीत असत, असे स्पष्ट दिसते. समारोप करताना