पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
११२
 

व्रतवैकल्यांच्या याद्या तयार करण्यात गुंतले होते. संतमहंतांना तर याचे कसलेच सोयरसुतक नव्हते, त्यांना फक्त मोक्ष दिसत होता व संसाराची असारता जाणवत होती. सत्तारूढ राजांनाही वर सांगितल्याप्रमाणे कसलीच दृष्टी नव्हती. त्यामुळे १२९६ साली यादवसत्तेला लागलेले हे ग्रहण हळूहळू खग्रास होत गेले व १३१८ साली ती पूर्ण नामशेष झाली. या वीसबावीस वर्षांच्या काळात घसरलेला डाव सावरण्याची, रामदेवराव, त्याचा पुत्र शंकरदेव, जावई हरपाळदेव यांना अनेक वेळा भरपूर संधी मिळाली होती, अवसर मिळाला होता. पण त्यांच्या ठायी ती कुवत नव्हती. आणि दक्षिणेकडच्या इतर सत्ताही अशाच मूढ, अंध व दुबळ्या होत्या.
 डॉ आळतेकर म्हणतात, अल्लाउद्दिनाची दुसरी स्वारी नऊ वर्षांनी झाली. तेवढ्या अवधीत देवगिरी, वरंगळ, द्वारसमुद्र व मदुरा या दक्षिणच्या हिंदुसत्तांनी सावध होऊ नये, याचे आश्रर्य वाटते. त्या सावध तर झाल्या नाहीतच, तर उलट अल्लाउद्दिन उत्तरेकडे वळताच, यादव कमजोर झाले असे पाहून, त्यांनी जुनी वैरे स्मरून त्यांच्या प्रदेशांवर हल्ले चढविले व घेता येईल तितका त्यांचा मुलुख घेतला. गुजराथचे चालुक्य व माळव्याचे परमार यांच्या बाबतीत यादवांनी हेच केले होते. शमसुद्दिन अल्तमश, बल्वन यांच्या स्वाऱ्यांनी जर्जर झालेल्या त्या प्रदेशावर त्यांनी अशीच धाड घातली होती. तेव्हा इतरांना दोष देण्याचा त्यांना काहीच अधिकार नव्हता (अर्ली हिस्टरी ऑफ दि डेक्कन, संपादक डॉ. यजदानी, प्र. ५५३ ).

शक्तिक्षय
 याचा अर्थ असा की या काळात हिंदूंची जीवशक्ती क्षीण झाली होती. समाज जगवावयाचा, धर्माचे रक्षण करावयाचे म्हणजे प्रथम त्याचे स्वातंत्र्य टिकविणे अवश्य असते. पण त्यासाठी लागणारे तत्त्वज्ञान, संघटनविद्या, विजिगीषा, राजनीतिनिपुणता, भौतिकविद्या, रणविद्या, यांचा या वेळच्या हिंदुसमाजात संपूर्ण अभाव होता. त्याचा धर्म, त्याची समाजरचना, त्याची राजनीती ही सर्व अंग अधोगामी झाली होती. त्यामुळे त्या समाजाच्या राजसत्तांना मुस्लिम आक्रमणाला तोंड देण्याचे सामर्थ्य मुळीच नव्हते. हा प्रश्न केवळ रणातले शौर्य व लष्कर यांचा नसून सर्व संस्कृतीचा आहे. तत्त्वज्ञान, धर्म, समाजरचना, अर्थशास्त्र, विद्या, कला या संस्कृतीच्या सर्वच अंगांचा स्वातंत्र्याशी घन संबंध असतो. ती अंगे लुळी झाली की स्वातंत्र्य टिकणे अशक्य होते. म्हणून आता आपल्याला त्या अंगांचा, संस्कृतीच्या त्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करावयाचा आहे. सातवाहनांपासून यादवअखेरपर्यंत त्यांच्या स्वरूपात फार मोठे परिवर्तन होत गेले आहे. या दीड हजार वर्षांच्या कालखंडात पहिली जवळजवळ हजार वर्षे जे जीवनाचे तत्त्वज्ञान महाराष्ट्राने स्वीकारले होते ते समाजाच्या जीवशक्तीला पोषक होते. पुढे त्यात अत्यंत अनिष्ट असे सिद्धान्त घुसले आणि येथल्या धर्मशास्त्रज्ञांनी, तत्त्ववेत्त्यांनी, राजनीतिज्ञांनी, राजपुरुषांनी तेच शिरसावंद्य मानले.