पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाडले. त्याचप्रमाणे सूचीचे काम त्यांचे वडील श्री. शं. ना. बर्वे यांनी आपण होऊन हौसेने पत्करले व त्यांच्या नेहमीच्या दक्षतेने पार पाडले, याबद्दल या पिता-पुत्रांचा मी शतशः ऋणी आहे. सूचीच्या कामात 'शं. नां.' ची मुलगी, माझी विद्यार्थिनी कु. नीला हिचाही वाटा मोठा आहे.
 लेखन करताना शेकडो ग्रंथ मला पाहावे लागले. पण माझे सुदैव असे की, मला ग्रंथांची उणीव कधीच पडली नाही. स. प. कॉलेज, पुणे विद्यापीठ, भारतीय संस्कृतिकोश मंडळ, नू. म. वि. प्रशाला, भांडारकर प्राच्यविद्यामंदिर या संस्थांतील ग्रंथपालांनी मला सर्व पुस्तके अगदी आत्मीयतेने पुरविली. कित्येक वेळा पत्र जाताच त्यांनी घरी पुस्तके पाठविली. हे बहुतेक सर्व ग्रंथपाल माझे विद्यार्थीच आहेत. त्यांचे आभार मानणे त्यांना आवडणार नाही, पण माझे ते कर्तव्य आहे. म्हणून एवढेच सांगतो की त्यांच्या या साह्यावाचून ग्रंथ पुरा झाला नसता. ग्रंथाचे मुद्रक श्री. लाटकर चित्रकार श्री. परसवाळे आणि नकाशे तयार करणारे श्री. गरसोळे व रेड्डी यांचे आभार मानणे आवश्यक आहे. ते मी मनःपूर्वक मानतो.
 मित्र श्री. अनंतराव कुलकर्णी आज वीस-बावीस वर्षे माझ्या पाठीशी उभे आहेत. माझे निबंधसंग्रह, माझे ग्रंथ बह्वंशी त्यांनीच प्रसिद्ध केले आहेत. उत्तरोत्तर महागाई वाढत चालली होती. पुस्तक प्रकाशन बिकट होत चालले होते. पण त्यांनी कधी माघार घेतली नाही. प्रकाशनाचे काम ते व्रताप्रमाणेच करतात. या वेळी तर त्यांची कसोटीच लागली. पण एवढा ग्रंथ कसा झेपेल असा विचार त्यांनी केला नाही उलट, ग्रंथ लवकर पुरा करून द्या अशी माझ्यामागे निकड लावली असा प्रकाशक भेटणे यापेक्षा सुदैव ते काय ? तो मला भेटला आणि त्याने अत्यंत साक्षेपाने व आपुलकीने ग्रंथ प्रकाशित केला. त्यांचे आभार मानण्याचा प्रयत्न करणेसुद्धा मला जमणार नाही. कारण ते कोठल्याच शब्दांत मावणार नाहीत.
 महाराष्ट्राच्या संस्कृतीचे सम्यक दर्शन घडवावे, असा हेतू ग्रंथ लिहिताना मनाशी होता. ते घडले आहे की नाही ते वाचकांनी ठरवावयाचे आहे.

पु. ग. स.