पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१००
 

कीर्ती प्राप्त झाली ती यामुळेच. या सर्व विजयामुळे पुलकेशी त्रिमहाराष्ट्रकांचा स्वामी झाला असे रविकीर्ती कवीने ऐहोळे येथील शिलालेखात म्हटले आहे. हे तीन महाराष्ट्र कोणते याविषयी पंडितांत वाद आहे. मुख्य महाराष्ट्र कोकण व कर्नाटक असे हे महाराष्ट्र असावे असे डॉ. डी. सी. सरकार म्हणतात. कर्नाटकाचा समावेश त्या वेळी महाराष्ट्रातच होत होता असे यावरून कोणी अनुमान करतात. कोणाच्या मते विदर्भ, कुंतल व कोकण हे ते तीन महाराष्ट्रक होत. पण याची चर्चा मार्ग केलेली असल्यामुळे येथे पुनरुक्ती करीत नाही.
 हर्षवर्धनाचा पराभव केल्यानंतर पुलकेशी दक्षिणेत परत आला व मग त्याने कोसल व कलिंग हे देश जिंकले. नंतर पूर्व समुद्रकाठाने दक्षिणेस जाऊन त्याने पिष्टापूरचा किल्ला जिंकला व तेथे त्याने आपला धाकटा भाऊ विष्णुवर्धन यास राज्यपाल म्हणून नेमिले. हे पूर्वेकडचे राज्य लवकरच स्वतंत्र झाले व हे घराणे तेथे इ. स. १०७० पर्यंत राज्य करीत होते. आणखी खाली उतरून पुलकेशीने कांचीचा पल्लव राजा पहिला महेन्द्रवर्मा याचा पराभव केला. या संघर्षामुळे शतकानुशतकांच्या दीर्घकालीन वैरास व अखंड संग्रामासच प्रारंभ झाला. बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट व कल्याणीचे चालुक्य यांचा दरपिढीस कांचीच्या पल्लवाशी एकदा तरी संग्राम व्हावयाचा हे आता ठरून गेले. पल्लवांना पराभूत केल्यावर पुलकेशीने कावेरी ओलांडली व चोल, पांड्य व केरळ यांच्या राजांशी स्नेहसंबंध जोडून तो परत बदामीला आला. असे दिग्विजय केल्यामुळे हा चालुक्यराज पूर्वपश्चिम सागराधीश झाला. त्रिसमुद्रतोयपीतवाहन ही पदवी त्याला शोभू लागली.
 या पुलकेशीच्या कारकीर्दीतच ह्युएनत्संग हा चिनी प्रवासी भारतात आला होता. मराठे लोक व मराठ्यांचा हा राजा यांचा त्याने मुक्तकंठाने गौरव केला आहे. पुलकेशीच्या राज्याचा परीघ ८३६ मैल असून त्याची राजधानी पाच मैल परिघाची आहे व तिच्या पश्चिमेस एक मोठी नदी आहे असे तो म्हणतो. हे वर्णन बदामीशी जुळत नाही, म्हणून ते नाशिकचे किंवा वेरूळचे असावे व तेथे पुलकेशीची दुसरी राजधानी असावी असा पंडितांचा तर्क आहे. मराठे लोक हे कणखर, साधे, मजबूत, प्रामाणिक असून अपमानाचा बदला घेतल्याखेरीज ते राहात नसत, असे ह्युएनत्संग म्हणतो. हे उदारवृत्तीचे असून शरणागताच्या रक्षणार्थ जीव धोक्यात घालण्यासही मागेपुढे पहात नसत. युद्धापूर्वी ते मद्यप्राशन करीत आणि मग त्यांच्यांतला एक भालाईत हजारांवर निर्भयपणे तुटून पडे. आपल्या गजदळालाही ते मद्यपान करवीत. आणि अशा त्या गजदलासह ही मराठासेना निघाली की तिच्यापुढे उभे राहण्यास कोणी धजत नसे. यामुळेच त्यांच्या राजाला शेजारच्या राज्यांची गणतीच नसे.
 पुलकेशीची कीर्ती त्याच्या या पराक्रमामुळे भारताबाहेरही पोचली होती. त्याने आपले वकील व इराणचा शहा खुश्रूपूर्वीज याच्याकडे धाडले होते. तेथे त्यांचा मोठा सन्मान झाला. अजिंठ्याच्या लेण्यांत या खुश्रूपूर्वीजचे वकील पुलकेशीकडे आले